ब्युरो टीम : अत्यंत चुरशीच्या झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी कडून लढलेल्या काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवाराचा ११ हजार ४० मतांनी पराभव केलाय. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही या विजयानंतर प्रतिक्रिया देताना हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय असल्याचे म्हंटले आहे. तसेच रोहित पवार यांनी विजयी उमेदवार धंगेकर यांचे अभिनंदन केले आहे.
भाजपाचा कसबा हा बालेकिल्ला समजला जातो. हार्ट ऑफ पुणे सिटी असे या मतदारसंघाला म्हंटले जाते. या मतदारसंघात गेल्या २८ वर्षांपासून भाजपचा आमदार होता. त्यातच या मतदारसंघात रविंद्र धंगेकर यांनी बाजी मारत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत रविंद्र धंगेकर यांना ७२ हजार ५९९ मते पडली, तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मते मिळाली. या विजयानंतर महाविकास आघाडीचे नेते भाजपच्या विरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. कसबा निवडणूक निकालावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून रोहित पवार यांनीही ट्विट करत या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. हा विजय जनतेचा आणि लोकशाहीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की...
'जय हो! सत्ता, पैसा, गुंडगिरी, धमक्या आणि दबावाला टाचाखाली चिरडत मविआने भाजपच्या नाकाखालून कसबा विधानसभेची जागा हिसकावून घेतली. हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे!विजयी उमेदवार रविंद्र धंगेकर यांचं मनःपूर्वक अभिनंदन!', असे ट्विट रोहित पवारांनी कसबा निवडणुकीच्या निकालानंतर केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा