Kasba Election : वापरा आणि फेकून द्या असे भाजपचे धोरण, उद्धव ठाकरे कडाडले



ब्युरो टीम: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव होताच महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले होते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर थेट भाजपच्या धोरणावरच टीका केलीय. वापरा आणि फेकून द्या, असे भाजपचे धोरण असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं असून भाजपावर निशाणा साधलाय.

कसबा पोटनिवडणुकीत भाजपा विरूद्ध मविआ अशी दुरंगी लढत झाली. भाजप आणि महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती तर रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. अखेर ११ हजार ४० मतांनी रवींद्र धंगेकर यांनी ही निवडणूक जिंकत इतिहास रचला आहे. त्यानंतर मविआच्या नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. या विजयानंतर मविआच्या नेत्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल सुरू केलाय.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले,’कसबा पेठ निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकल्याचा मला आनंद आहे. एवढ्या मोठ्या प्रभावातून कसबा बाहेर पडत असेल तर देश बाहेर पडायला काही हरकत नाही. एका चांगल्या बदलाची ही सुरूवात आहे. भाजपाच्या विरोधातली मतांची संख्या वाढते आहे, व ही मते एकत्र करणं मोठं आव्हान आहे. मतदार जागरूक होत चालले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने एकत्र राहणं आणि कसोशीने प्रयत्न करणं आवश्यक आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी ठाकरेंनी भाजपच्या धोरणावर सुद्धा जोरदार टीका केली. ते म्हणाले,‘ वापरा आणि फेका हे भाजपाचं धोरण आहे, हे मी बोललो होतो. तेच पुण्यात झालं. शिवसेनेचाही वापर करून त्यांना फेकून दिलं. मुक्ता टिळक यांच्या घरातही तिकिट दिलं गेलं नाही. त्यामुळे वापरा आणि फेका हेच समोर आलं. गिरीश बापट यांना ऑक्सिजनच्या नळ्या लावून प्रचाराला आणलं. सहानुभूती पाहिजे, पण ती पण सिलेक्टिव्ह हवी. अशी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न मतदार कधी स्वीकारत नाही,’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने