Kasba Peth Assembly : धंगेकरांच्या विजयामागे राहुल गांधींच्या ‘त्या’ फोनचा ‘हात’!



ब्युरो टीम: भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघाला सुरुंग लावत येथे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर विजयी झाले आहेत. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा धंगेकर यांनी ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. भाजपने कसब्याची जागा जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री येथे तळ ठोकून होते. पण यासर्वांवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा एकच फोन वरचढ ठरल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी जर तो फोन केला नसता तर कदाचित कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता.

कसबा पोटनिवडणूक ही भाजप व महाविकास आघाडी या दोघांकडूनही अतिशय प्रतिष्ठेची करण्यात आली होती. अगदी मतदानाच्या दिवसापर्यंत ही निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी गाजली. भाजप व महाविकास आघाडी  या दोन्ही बाजुचे नेते कसब्यात अगदी ठाण मांडून होते. त्यामुळे सुरुवातीपासून चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते. या निवडणुकीचा आज निकाल लागला असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांनी निवडणुकीत बाजी मारत भाजपचा बालेकिल्ला असणारा हा  मतदारसंघ खेचून आणत इतिहास घडवला आहे. मात्र, या विजयामागे राहुल गांधी यांचा एक फोन खूप महत्त्वपूर्ण ठरला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू  झाली आहे. हा फोन राहुल गांधी यांनी काँग्रेसकडून बंडखोरी करून कसबा पोट निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या बाळासाहेब दाभेकर यांना केला होता. त्यानंतर दाभेकर यांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. 

नेमकं काय झालं होतं?

कसबा पोटनिवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून काँग्रेसकडून बंडखोरी करीत बाळासाहेब दाभेकर यांनी अर्ज भरला होता. दाभेकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा,, यासाठी त्यांची पक्षश्रेष्ठीकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. पण त्यांना यश येत नव्हते. अखेर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी दाभेकर यांना फोन केला, व त्यानंतर दाभेकर यांनी उमेदवारी मागे घेतली होती. आता आज निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा याप्रकाराची चर्चा सुरू झाली आहे. कारण समजा, राहुल गांधी यांनी दाभेकर यांना फोन केला नसता, व त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नसता, तर कदाचित कसबा निवडणुकीचा निकाल आज वेगळा येण्याचीही शक्यता होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने