Radhakrishna Vikhe Patil :शरद पवारांनी आता स्वप्नरंजन करणे थांबवावे, विखेंची जोरदार टीका



ब्युरो टीम : 'शरद पवारांनी आता स्वप्नरंजन करणे थांबवले पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये भविष्यकारांची संख्या वाढली आहे. रस्त्याच्याकडेला पूर्वी जे पोपट बसत होते, त्यांची उपासमार तुम्ही का करता? भविष्य सांगणं त्यांचं काम आहे, ते काम त्यांना करू द्या,' अशी खोचक टीका राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर केली आहे.

भाजपाचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केली आहे. '२०२४ मध्ये शिंदे-फडणवीसांविरोधात जनमत जाईल,' या थोरातांच्या वक्तव्यावर बोलताना विखेंनी 'त्यांनी आधी नाशिकमधील मविआ उमेदवाराच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी,' असा टोला लगावला.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, 'मला वाटतं नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकासआघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. बाळासाहेब थोरातांनी आधी त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ते महत्त्वाचं आहे. त्याबद्दल थोरात का बोलत नाहीत.'

'प्रत्येकजण आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढत आहे. कसबा निवडणुकीवरून प्रत्येकाला परिस्थिती बदलली आहे असं वाटत आहे. प्रत्येकाचं स्वप्नरंजन सुरू आहे. ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ प्रत्येकजण पाहत आहे. ती स्वप्नं पाहणं आम्ही थांबवू शकत नाही. ती स्वप्नं पाहण्याचा आनंद त्यांना घेऊ दिला पाहिजे,' असं मत राधाकृष्ण विखेंनी व्यक्त केलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने