Raj Thackeray : उद्धव ठाकरेंना मी ओबेरॉय हॉटेलमध्ये नेलं आणि... राज ठाकरेंनी सांगितला तो प्रसंग



ब्युरो टीम : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाडवा मेळाव्याच्या भाषणात  शिवसेनेतून बाहेर पडण्याआधीचा एक प्रसंग सांगितला. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंशी झालेल्या संभाषणाचा यावेळी राज ठाकरेंनी उल्लेख केला.  उद्धव ठाकरेंना ओबेरॉय हॉटेलमध्ये का नेलं होतं, ते देखील ठाकरे यांनी सांगितलं.

राज ठाकरे म्हणाले...

उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या संभाषणाचा प्रसंग सांगण्याआधी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे गटाच्या लोकांना इशाराही दिला. 'त्यांच्या लोकांना आताच सांगून ठेवतो की, माझं बोलणं झाल्यावर उद्या तोंड उचकटू नका. कारण त्यानंतर माझ्या तोंडून काय बाहेर पडेल, ते झेपणार नाही तुम्हाला. सगळ्यांना महाबळेश्वरचा प्रसंग सांगितला जातो. त्याच्याआधी काय काय घडलं, या सांगणं गरजेचं आहे. आताची परिस्थिती का ओढवली, हे त्यावरून समजेल., असं राज ठाकरेंनी सांगितल. ते पुढे म्हणाले, 'शिवसेनेतून मला बाजूला सारण्याचा प्रयत्न होत होता, हे मला कळत होतं. मी एकदा उद्धवकडे गेलो आणि त्याला म्हटलं गाडीत बस आपल्याला बाहेर जायचंय. आम्ही ओबेरॉय हॉटेलमध्ये गेलो. मी त्याला समोर बसवलं. मी शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतोय हे. मी त्याला विचारलं बोल तुला काय हवंय? तुला पक्षप्रमुख व्हायचंय, हो. सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचंय हो. पण फक्त मला सांग माझं काम काय आहे?' असं राज ठाकरेंनी सांगितलं.

राज ठाकरे पुढे म्हणाले,'मी उद्धवला म्हणालो, मला फक्त प्रचारासाठी बाहेर काढू नका. एरवी घरात ठेवायचं आणि प्रचाराला बाहेर काढायचं. मी प्रचार केल्यानंतर निवडून आलेल्या लोकांनी जबाबदारी सांभाळायची नाही. पुढच्या वेळी प्रचाराला जायचं. काय तोंड दाखवू त्यांना. मला उद्धव म्हणाला मला काही प्रॉब्लेम नाही. मी म्हटलं ठरलं मग? नक्की ना? तो म्हणाला नक्की', असं राज ठाकरेंनी सांगितलं.

दरम्यान, ओबेरॉय हॉटेलमधील या भेटीनंतर मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंशी झालेल्या संभाषणाचाही उल्लेख राज ठाकरेंनी केला. “तिथून आम्ही घरी आलो. बाळासाहेब ठाकरे झोपले होते. मी त्यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की सगळा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला. म्हणाले काय झालं? मी म्हटलं मी उद्धवशी बोललो. हे सगळं बोलणं झालं. सगळं मिटलं. त्यांनी मला मिठी मारली. मला म्हणाले उद्धवला बोलव. मी बोलावणं पाठवलं तर म्हणे येतायत. बाळासाहेब अधीर झाले होते. थोड्या वेळाने म्हणाले कुठे आहे उद्धव. मी परत बाहेर गेलो, तर मला तिकडे सांगितलं की ते बाहेर निघून गेले. या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी चालल्या होत्या की मी बाहेर कधी जातोय. त्रास देऊन ही माणसं बाहेर कशी टाकता येतील,अशी परिस्थिती निर्माण केली होती,' असं राज ठाकरे  म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने