Ram Navami 2023 : रामनवमीनिमित्त 'या' शहरात पोलिसांचा रुट मार्च



विक्रम बनकर, नगर : उद्या (३० मार्च) रोजी साजरा होणारा श्रीराम नवमी उत्सव तसेच या उत्सवानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने आज अहमदनगर शहरातून रुट मार्च काढून सण-उत्सवांमध्ये गोंधळ घालण्याचा विचार असणाऱ्यांना एकप्रकारे समज दिली आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात नेहमी शांतता राहावी, यासाठी आम्ही सदा तत्पर आहोत, असाच संदेश या रुट मार्च मधून देण्यात आला.

देशभर गुरुवारी  (३० मार्च) रामनवमी उत्सव साजरा होत आहे. असंख्य रामभक्त या उत्सवात सहभागी होतात. अहमदनगर शहरात रामनवमीला मिरवणूक निघते. या मिरवणूकीमुळे काही मार्ग बंद केले जातात. मात्र नागरिकांचे हाल होऊ नये, यासाठी काही पर्यायी मार्ग सुचवले जातात. मिरवणुकीत सहभागी होणार मोठा जनसमुदाय लक्षात घेता, ही मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस विभागाने आज रुट मार्च काढला आहे.


मिरवणूक मार्गावर 'सीसीटीव्ही'चा वॉच

दरम्यान, श्रीराम नवमीच्या मिरवणुकीसाठी लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताबाबत सांगताना कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले,'श्रीराम नवमीची मिरवणूक उद्या असून त्या अनुषंगाने मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. ५५ ते ६० सीसीटीव्ही कॅमेरे मिरवणूक मार्गावर लावले आहेत. मिरवणूक मार्गावरील वाहतूक वळवण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. या मिरवणुकीससाठी १५० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी व ५० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आलाय. याशिवाय सोशल मीडियावर कोणीही चुकीचे संदेश पसरू नये, या अनुषंगाने मीटिंग घेण्यात आली आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणारे संदेश पसरवणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असून कोणीही सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण करणारे चुकीचे संदेश पसरू नये,'असे आवाहनही यादव यांनी केले आहे.

पहा व्हिडिओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने