Ram Navami 2023 : शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी


विक्रम बनकर, नगर :  शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था वतीने आयोजित केलेल्‍या श्री रामनवमी उत्‍सव उत्साहात सुरू आहे. आज, गुरुवारी मुख्‍य दिवशी रात्रभर मंदिर दर्शनाकरीता खुले असल्‍यामुळे लाखो भाविकांनी श्रींच्‍या समाधीचे दर्शन घेतले. तर व्‍दारकामाई मंडळ, मुंबईच्‍या वतीने मंदिर प्रवेशव्‍दार, श्री साईप्रसादालय प्रवेशव्‍दार व लेंडीबागेत उभारण्‍यात आलेले भव्‍य देखावे आणि आकर्षक विद्युत रोषणाई या उत्‍सावाचे आकर्षण ठरले.

आज उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी पहाटे सव्वा पाच वाजता काकड आरतीनंतर अखंड पारायणाची समाप्‍ती झाली. श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची व्‍दारकामाईतून गुरुस्‍थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणुकीत संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ यांनी वीणा, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ले.कर्नल डॉ.शैलेश ओक व संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी यांनी श्रींची प्रतिमा घेवुन मिरवणूकीत सहभाग घेतला. याप्रसंगी संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, मालती यार्लगड्डा, मिनाक्षी सालीमठ, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्‍त व ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते. सकाळी साडेसहा वाजता प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्‍यांची सुविद्य पत्‍नी मालती यार्लगड्डा, जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी मिनाक्षी सालीमठ आणि प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्‍या हस्‍ते कावडीचे पूजन करण्‍यात आले. सकाळी आठ वाजता समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा, लेंडीबागेतील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे पूजन व व्‍दारकामाई मंदिरातील गव्‍हाच्‍या पोत्‍याचे पूजन करण्‍यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे सुद्धा उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता समाधी मंदिराच्‍या उत्‍तर बाजुच्‍या स्‍टेजवर ह.भ.प.विक्रम नांदेडकर यांचे श्रीराम जन्‍मावर कीर्तन झाले. कीर्तनानंतर  श्रीराम जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला. यावेळी साईभक्‍त व ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते. दुपारी साडे बारा वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. माध्‍यान्‍ह आरतीपुर्वी रासने कुटुंबीय व देशपांडे (निमोणकर) कुटुंबीय यांच्‍या वतीने नवीन निशाणांची वि‍धीवत पूजा करुन दुपारी चार वाजता निशाणांची मिरवणूक काढण्‍यात आली. तर सायंकाळी पाच वाजता श्रींच्‍या रथाची शिर्डी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्‍यात आली. या रथ मिरवणुकीत झांज, लेझीमपथक, बॅण्‍डपथक, ढोलपथके यांच्‍यासह संस्‍थानचे अधिकारी, कर्मचारी, साईभक्‍त व शिर्डी ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते. मिरवणूक परत आल्‍यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता धुपारती झाली. रात्री सव्वा सात ते सव्वा नऊ यावेळेत मंगेश अमदुरकर, साई म्‍युझिकल ग्रुप, वर्धा यांचा भजन संध्‍या कार्यक्रम श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर होणार आहे. तर,रात्री सव्वा नऊ वाजता श्रींची गुरुवारची नित्‍याची पालखी मिरवणूक काढण्‍यात येईल.

आकर्षक सजावटीने वेधले भाविकांचे लक्ष 

उत्‍सवानिमित्‍त समाधी मंदिर व परिसरात अमेरिका येथील दानशूर साईभक्‍त श्रीमती शोभा पै यांच्‍या देणगीतून करण्‍यात आलेल्‍या फुलांच्‍या आकर्षक सजावटीने भाविकांचे लक्ष वेधुन घेतले. तर व्‍दारकामाई मंडळ, मुंबई यांच्‍या वतीने मंदिर प्रवेशव्‍दारावर, लेंडीबाग व श्री साईप्रसादालयाच्‍या प्रवेशव्‍दारावर उभारण्‍यात आलेल्‍या भव्‍य देखावे व आकर्षक विद्युत रोषणाई या उत्‍सावाचे विशेष आकर्षण ठरले.  

उद्या उत्सवाची होणार सांगता

उद्या उत्‍सवाच्‍या सांगता दिवशी पहाटे ०५.०५ वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन, सकाळी ०६.५० वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी ०७.०० वा. गुरुस्‍थान मंदिरामध्‍ये रुद्राभिषेक, सकाळी १०.०० वा. ह.भ.प.विक्रम नांदेडकर यांचे गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वा. माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद, सायं. ०६.३० वा. धुपारती होईल. रात्रौ ०७.१५ ते ०९.३० यावेळेत श्रीमती सुनिता कोटारी, तिरुपती यांचा शास्‍त्रीय नृत्‍य कोलाटन्‍स, भजन संध्‍या कार्यक्रम होणार असून रात्रौ १०.०० वा. श्रींची शेजारती होईल.

पहा व्हिडिओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने