RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत कोणते प्रस्ताव झाले पारित? वाचा



ब्युरो टीम : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १२ ते १४ मार्च २०२३ दरम्यान समलखा (पानिपत) येथे झाली. या प्रतिनिधी सभेत  नेमके कोणते प्रस्ताव पारित झालेत, याची माहिती आता बाहेर आली आहे. संघाच्या प्रतिनिधी सभेत झालेल्या पारित प्रस्तावांबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. सुरेश (नाना) जाधव  यांच्या उपस्थितीत पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत  माहिती देण्यात आली. यावेळी रा.स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते. चला तर, हे पारित प्रस्ताव नेमके कोणते आहेत, ते जाणून घेऊया.

अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतील पारित प्रस्ताव

१) अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे विचारपूर्वक बनलेले हे मत आहे की, विश्वकल्याणाचे उदात्त लक्ष्य साकार करण्यासाठी भारताच्या ‘स्व’चा सुदीर्घ प्रवास आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणेचा स्रोत ठरला आहे. परकीय आक्रमणे तसेच संघर्षाच्या काळात भारतीय जनजीवन विस्कळीत झाले तसेच सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक व्यवस्थांवर खोलवर आघात झाला. या कालखंडात पूज्य संत आणि महापुरुषांच्या नेतृत्वात संपूर्ण समाजाने सतत संघर्षरत राहून आपले ‘स्व’ टिकवून ठेवले. या संग्रामाची प्रेरणा स्वधर्म, स्वदेशी आणि स्वराज्य या ‘स्व’च्या त्रिसूत्रीत सामावलेली होती. तिच्यात संपूर्ण समाज सहभागी झाला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र प्रसंगी संपूर्ण राष्ट्राने या संघर्षात योगदान देणाऱ्या जननायक, स्वातंत्र्य सेनानी आणि महापुरुषांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले आहे.

२) स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण अनेक क्षेत्रांमध्ये मोठी कामगिरी केली आहे. भारताची अर्थव्यवस्था आज जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून समोर येत आहे. भारताच्या सनातन मूल्यांवर आधारित नवोत्थानाचा जग स्वीकार करत आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या संकल्पनेवर आधारित विश्वशांती, विश्वबंधुत्व आणि मानव कल्याणासाठी भारत आपली भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज आहे. 

३)अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे हे मत आहे, की सुसंघटित, विजयी आणि समृद्ध राष्ट्र करण्याच्या प्रक्रियेत समाजातील सर्व वर्गांसाठी मूलभूत गरजांची पूर्तता, सर्वांगीण विकासाच्या संधी, तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण उपयोग आणि पर्यावरणपूरक विकास यांच्यासह आधुनिकीकरणाच्या भारतीय संकल्पनेच्या आधारावर नवी उदाहरणे घडविणे यांसारखी आव्हाने पार करावी लागतील. राष्ट्राच्या नवोत्थानासाठी आपल्याला कुटुंब संस्थेचे बळकटीकरण, बंधुतेवर आधारित समरस समाजाची निर्मिती तसेच स्वदेशी भावनेने उद्यमतेचा विकास आदी उद्देश गाठण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. या दृष्टीने समाजातील सर्व घटकांना, विशेषतः युवा वर्गाला सामावून घेण्याची आवश्यकता आहे. 

४)संघर्षाच्या काळात परकीय शासनापासून मुक्ती मिळविण्यासाठी ज्या प्रकारे त्याग आणि बलिदानाची आवश्यकता होती, त्याच प्रकारे वर्तमान काळात हे लक्ष्य गाठण्यासाठी नागरिक कर्तव्यांप्रती कटिबद्ध तसेच वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्त समाजजीवनसुद्धा घडवावे लागेल. या संदर्भात मा. पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या ‘पंच-प्रणा’चे आवाहन महत्त्वाचे आहे. 

५)अनेक देश भारताबद्दल सन्मान आणि सद्भाव बाळगतात, मात्र दुसरीकडे भारताचे हे ‘स्व’ आधारित पुनरुत्थान जगातील अनेक शक्ती सहन करू शकत नाहीयेत, हे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला अधोरेखित करायचे आहे. हिंदुत्वाच्या विचाराला विरोध करणाऱ्या देशातील तसेच बाहेरील अनेक शक्ती हितसंबंध आणि भेदांना पुढे आणून समाजात परस्पर अविश्वास, व्यवस्थेबद्दल अनास्था आणि अराजकता निर्माण करण्यासाठी नवनवीन कारस्थाने रचत आहेत. आपल्याला या सर्वांबद्दल जागृत राहून त्यांचे मनसुबेही अयशस्वी करावे लागतील. 

६) हा अमृतकाळ आपल्याला भारताला वैश्विक नेतृत्व प्राप्त करून देण्यासाठी सामूहिक उद्यम करण्याची संधी देत आहे. भारतीय चिंतनाच्या संदर्भात सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, लोकतांत्रिक, न्यायिक संस्थांसहित समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये कालसुसंगत व्यवस्था विकसित करण्याच्या या कार्यात संपूर्ण शक्तीने सहभागी व्हावे, जेणेकरून भारत जागतिक पातळीवर समर्थ, वैभवसंपन्न आणि विश्वकल्याणकारक राष्ट्राच्या स्वरूपात उचित स्थान प्राप्त करू शकेल, असे आवाहन अखिल भारतीय प्रतिनिधी सभा प्रबुद्ध घटकांसहित संपूर्ण समाजाला करते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने