Sai Baba : ठरलं! शिर्डीत असा साजरा होईल श्रीरामनवमी उत्‍सव



ब्युरो टीम :  श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी बुधवार २९ मार्च ते शुक्रवार ३१ मार्च २०२३ याकाळात श्रीरामनवमी उत्‍सव साजरा करण्‍यात येणार असून या निमित्‍ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहेत, अशी माहिती संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

जाधव म्‍हणाले, 'श्रीरामनवमी उत्‍सवाची सुरुवात १९११ मध्‍ये श्री साईबाबांचे अनुमतीने करण्‍यात आली. तेंव्‍हापासून प्रतीवर्षी हा उत्‍सव मोठ्या उत्‍साहाच्‍या वातावरणात शिर्डी येथे साजरा केला जातो. यावर्षी यानिमित्‍ताने २९ मार्च रोजी पहाटे ०५.१५ वा. श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०६.०० वा. व्‍दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, ०६.२० वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन, सकाळी ०७.०० वा. श्रींची पाद्यपुजा,  दुपारी १२.३० वा. माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद आदि कार्यक्रम होणार आहे. दुपारी ०४.०० वा. ते सायं. ०६.०० यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्‍टेजवर कीर्तन होणार आहे. सायंकाळी ०६.३० वा.धुपारती होणार होईल. रात्रौ ०७.१५ ते ०९.३० या वेळेत निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम होणार असून रात्रौ ०९.१५ वा. चावडीत श्रींच्‍या पालखीची गावातून मिरवणूक काढण्‍यात येईल. मिरवणूक परत आल्‍यानंतर रात्रौ १०.३० वा. शेजारती होईल. यादिवशी पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहणार आहे.

३० मार्च रोजी पहाटे ०५.१५ वा. श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वा. अखंड पारायणाची समाप्‍ती होवून श्रींच्‍या फोटो व पोथीची मिरवणूक होईल. सकाळी ०६.२० वा. कावडींची मिरवणूक व श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन. सकाळी ०७.०० वा. श्रींची पाद्यपुजा,  सकाळी १० ते १२ यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्‍टेजवर श्रीरामजन्‍म किर्तन कार्यक्रम, दुपारी १२.३० वा. माध्‍यान्‍ह आरती होणार आहे. दुपारी ०४.०० वा. निशाणांची मिरवणूक तर सायं. ०५.०० वा. श्रींच्‍या रथाची गावातून मिरवणूक होणार आहे. मिरवणूक परत आल्‍यानंतर सायं. ०६.३० वा. धुपारती होईल. रात्रौ ०७.१५ ते ०९.१५ या वेळेत निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम होणार असून रात्रौ ०९.१५ वा. श्रींची गुरुवारची नित्‍याची पालखी मिरवणूक होईल. रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत श्रींचे समोर इच्‍छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. तसेच हा उत्‍सवाचा मुख्‍य दिवस असल्‍याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. यामुळे  ३० मार्च रोजीची नित्‍याची शेजारती व  ३१ मार्च रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.

उत्‍सवाच्‍या सांगता दिनी ३१ मार्च रोजी पहाटे ०५.०५ वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन, सकाळी ०६.५० वा. श्रींची पाद्यपुजा,  सकाळी ०७.०० वा. गुरुस्‍थान मंदिरामध्‍ये रुद्राभिषेक, सकाळी १०.०० वा. गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वा. माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद, सायं. ०६.३० वा. धुपारती होईल. रात्रौ ०७.१५ ते ०९.३० या वेळेत निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम होणार असून रात्रौ १०.०० वा. श्रींची शेजारती होईल.

उत्‍सवाचे निमित्‍ताने व्‍दारकामाई मंदिरात प्रथम दिवशी होणा-या श्रीसाईसच्‍चरिताच्‍या अखंड पारायणामध्‍ये जे साईभक्‍त भाग घेवू इच्छितात अशा साईभक्‍तांनी आपली नावे मंगळवार २८ मार्च २०२३ रोजी दुपारी ०१.०० वा. ते सायंकाळी ०५.१५ वा. यावेळेत देणगी काऊंटर येथे नोंदवावीत. त्‍याच दिवशी सायंकाळी ०५.२० वाजता समाधी मंदिर स्‍टेज येथे सोडत पध्‍दतीने पारायणासाठी भक्‍तांची नावे निश्चित करण्‍यात येतील. तसेच गुरुवार ३० मार्च या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी होणा-या कलाकारांच्‍या हजेरी कार्यक्रमासाठी इच्‍छुक कलाकरांनी आपली नावे त्‍याच दिवशी समाधी मंदिराशेजारील अनाऊन्‍समेंट सेंटरमध्‍ये मंदिर कर्मचा-याकडे आगाऊ नोंदवावीत, असे सांगून सर्व साईभक्‍तांनी या उत्‍सवास उपस्थित राहून उत्‍सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन ही जाधव यांनी केले आहे.

उत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ व प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, संजय जोरी, कैलास खराडे, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्‍नशिल आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने