ब्युरो टीम : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मर्जीतील नेते म्हणून ओळखले जाणारे संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. संदीप देशपांडे शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. देशपांडे यांना रॉड आणि स्टम्पच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. त्यांच्या हाताला आणि पायावर स्टम्पचा फटका बसल्याने दुखापत झाली असल्याची माहिती आहे. दरम्यान, हल्लेखोर कोण होते, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांच्या तोंडावर मास्क होते. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही. या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप देशपांडे आज नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कमध्ये गेले होते. ते एकटेच होते. त्यावेळी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर चार ते पाच लोक बसले होते. त्यांच्या तोंडावर मास्क होते. या टोळक्याने संदीप देशपांडे यांच्यावर स्टम्प आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने हल्ला चढवला. टोळक्यातील एकाने संदीप देशपांडे यांच्या डोक्यात स्टम्प घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वार संदीप देशपांडे यांनी हातावर झेलला. या झटापटीत एक फटका त्यांच्या पायावर बसला. हा सगळा प्रकार पाहून आजुबाजूचे लोक संदीप देशपांडे यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.
टिप्पणी पोस्ट करा