ब्युरो टीम: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज सकाळी मॉर्निंग वॉकला आले असताना हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये देशपांडे हे जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. घटनेची माहिती मिळताच मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांनीही हिंदुजा रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, देशपांडे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
संदीप देशपांडे हे आज सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्क येथे आले होते. त्यावेळी याठिकाणी दबा धरून बसलेल्या टोळक्याने स्टम्पच्या साहाय्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोर देशपांडे यांच्या डोक्यात स्टम्प घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशपांडे यांनी स्टम्पचा फटका हाताने अडवला. या झटापटीत त्यांच्या पायालाही दुखापत झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन संदीप देशपांडे यांना डिस्चार्ज दिला आहे. देशपांडे हे व्हीलचेअरवर बसून रुग्णालयाबाहेर आले. त्यानंतर राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीत बसून ते घराकडे रवाना झाले. संदीप देशपांडे रुग्णालयातून निघेपर्यंत राज ठाकरे आणि अमित ठाकरे हिंदुजा रुग्णालयात थांबून होते. देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार, हे पाहावे लागेल.
टिप्पणी पोस्ट करा