ब्युरो टीम : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने बुधवार दिनांक २९ मार्च ते शुक्रवार दिनांक ३१ मार्च अखेर साजरा करण्यात येणा-या श्रीरामनवमी उत्सवाची तयारी पुर्ण झाली असून या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले, 'श्रीरामनवमी उत्सवाची सुरुवात १९११ मध्ये श्री साईबाबांचे अनुमतीने करण्यात आली. तेव्हापासून प्रतीवर्षी हा उत्सव मोठया उत्साही वातावरणात शिर्डी येथे साजरा केला जातो. उत्सवात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून दर्शनाची व्यवस्था सुखकर व्हावी, तसेच भाविकांची उन्हापासुन संरक्षणाकरीता मंदिर परिसरात, मंगल कार्यालय व साईनगर मैदान आदी ठिकाणी सुमारे ११ हजार चौ.फुट मंडप उभारण्यात आलेले आहेत. तसेच साईभक्तांच्या अतिरिक्त निवासव्यवस्थे करीता साईबाबा भक्तनिवासस्थान (५०० रुम), साईधर्मशाळा व साईनगर मैदान याठिकाणी सुमारे ३९ हजार चौ.फुट बिछायत व कनातीसह मंडपाची उभारणी करण्यात आलेली असून यामध्ये विद्युत, पाणी पुरवठा, स्वच्छतागृह व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. याबरोबरच मुंबई व परिसरातून पालखी सोबत येणा-या पदयात्रींची निवा-याची सोय सुयोग्य होण्यासाठी संस्थानच्या वतीने मुंबई ते शिर्डी महामार्गावरील खर्डी, गोलभान, कसारा बायपास, लतिफवाडी, घोटी, सिन्नर, खोपडी, पांगरी, वावी, पाथरे, दुशिंगवाडी, मलढोन व झगडे फाटा आदी ठिकाणी असलेले पालखी थांबेंच्या जागी सुमारे ०१ लाख १७ हजार चौ.फुट कापडी मंडप कनात बिछायतीसह उभारण्यात आलेले असून यामध्ये विद्युत व पाणी पुरवठ्याची सोय करण्यात आलेली आहे. याकामी कोपरगांव येथील वाल्मीकराव कातकडे बंधु यांनी विनामुल्य १० पाण्याचे टॅकर चालकासह दिलेले असून याकरीता संस्थानच्या वतीने इंधन खर्च व देखरेखीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच पालख्या शिर्डी येथे आल्यानंतर पदयात्रींची साई धर्मशाळा येथे नाममात्र दरात निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सिन्नर ते शिर्डी या मार्गावर पदयात्रींना आवश्यकतेनूसार तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी फिरते वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच संस्थानच्या वतीने उन्हाळयाच्या कालावधीत साईभक्तांच्या सोयीसाठी मंदिर परिसर, साई प्रसादालय व भक्तनिवासस्थान परिसरात ताडपत्रीचे छत असलेले उन्हाळी कापडी मंडप ही उभारण्यात आलेले आहेत.'
तसेच गुरुस्थान मंदिरासमोर दिक्षीत वाडा, गेट नंबर ०२ दर्शनरांग, शांतीनिवास इमारतीच्या दुस-या मजल्यावरील दर्शनरांग, मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडप, श्री साईआश्रम (१००० रुम) व श्री साईप्रसादालय आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु राहणार असून या ठिकाणी तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहीका ही तैनात करण्यात आलेल्या आहेत. भाविकांना श्रींच्या दर्शनासाठी येणे-जाणेकरीता श्री साईआश्रम, श्री साईबाबा भक्तनिवासस्थान, श्री साई धर्मशाळा व श्री साईप्रसादालय आदि ठिकाणाहुन संस्थानच्या जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी १५० क्विंटल साखरेचे अतिरिक्त लाडू तयार करण्यात येणार असुन श्री साईनाथ मंगल कार्यालय, व्दारकामाई समोरील खुले नाट्यगृह, मारुती मंदिराशेजारी साईकॉम्प्लेक्स, श्री साईप्रसादालय, सेवाधाम इमारत, शिर्डी विमानतळ व सर्व निवासस्थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आलेले आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास अतिरिक्त लाडू विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच श्री रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिर व परिसरात अमेरिका येथील दानशूर साईभक्त श्रीमती शोभा पै यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार असून मुंबई येथील व्दारकामाई मंडळ यांच्या वतीने समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व प्रवेशव्दारावर काल्पनिक भव्य देखावा उभारण्यात येत आहे. तसेच मंदिर परिसर व शिर्डी परिसरात बंदोबस्त चोख ठेवण्यासाठी संस्थान सुरक्षा विभागाचे संरक्षण कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी, सिघ्र कृतीदल पथक, बॉम्ब शोधक पथक तैनात करण्यात आले आहे. याबरोबरच श्री साईबाबा संस्थान, पोलिस प्रशासन व शिर्डी नगरपंचायत यांचे संयुक्त अतिक्रमण व दलाल प्रतिबंधक पथक ही सज्ज ठेवण्यात आलेले आहेत.
तसेच उत्सव कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक २९ मार्च रोजी सायं.०४.०० ते ०६.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा कीर्तन कार्यक्रम व रात्रौ ०७.१५ ते ०९.३० यावेळेत अलोक मिश्रा, दिल्ली यांचा भजन संध्या कार्यक्रम होणार आहे. दिनांक ३० मार्च रोजी सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा कीर्तन कार्यक्रम व रात्रौ ०७.१५ ते ०९.१५ यावेळेत मंगेश अमदुरकर, वर्धा यांचा भजन संध्या कार्यक्रम होणार आहे. दिनांक ३१ मार्च रोजी सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचे काल्याचे कीर्तन कार्यक्रम व रात्रौ ०७.१५ ते ०९.३० यावेळेत श्रीमती सुनिता कोटारी, तिरुपती यांचा शास्त्रीय नृत्य कोलाटन्स, भजन संध्या कार्यक्रम होणार आहे. कीर्तन कार्यक्रम हे समाधी मंदिराच्या उत्तर बाजुच्या स्टेजवर होईल. तर निमंत्रित कलारांचे कार्यक्रम मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर होणार असल्याचे ही जाधव यांनी सांगितले.
उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, संजय जोरी, मुख्यलेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे, उपकार्यकारी अभियंता श्री.बी.डी.दाभाडे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशिल आहे.
टिप्पणी पोस्ट करा