Shivaji Kardile : 'फडणवीसांनी सांगितलं आणि विखेंनी करून दाखवलं, माजी आमदार शिवाजी कर्डिलेंनी सांगितला तो किस्सा



विक्रम बनकर, नगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्षपदी महाविकास आघाडीने माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना संधी देण्याचे निश्चित केले. त्यासाठी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार व काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काल, मंगळवारी (७ मार्च) नगरला येऊन बैठकही घेतली. बैठकीत सर्व जुळूनही आलं. पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी असा काही प्लॅन केला की, प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी बाजी मारली. हा संपूर्ण घटनाक्रमच निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर शिवाजी कर्डिले यांनी सांगितला.

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्षपदाची आज निवड हाेणार होती. या निवडीसाठी आज सकाळी अकरा वाजता संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात आली होती. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर हाेते. मविआने चंद्रशेखर घुलेंची अध्यक्षपदासाठी नाव निश्चित केल्याने त्यांनी अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्जही भरला. पण अर्ज भरण्याच्या अखेरच्या मिनिटाला भाजपच्या वतीने अचानकपणे माजी आमदार शिवाजी कर्डिले  यांचा देखील अर्ज आला. त्यामुळे या निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला.  अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान घेतले. या मतदानामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील यांना नऊ मते मिळाली. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना दहा मते मिळाली. एक मतदार तटस्थ राहिल्याने या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पण ही संपूर्ण निवडणूक भाजपाकडे वळवण्यात महत्त्वाची भूमिका राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निभावली. विजयी उमेदवार कर्डिले यांनीच याबाबत माहिती दिली.

कर्डिले म्हणाले...

निवडणूक जिंकल्यानंतर माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले, 'जिल्हा बँकेची अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचा विचार नव्हता. मात्र काल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे नगरमध्ये आले होते. त्यांनी या निवडणुकीच्या अनुषंगाने मीटिंग ही घेतली. या मिटींगला ते आम्हाला बोलवतील, अशी अपेक्षा होती. परंतु त्यांनी बोलावलं नाही. अखेर हा विषय आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातला. त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने होत असलेल्या बैठकीला आम्हाला बोलावले नसल्याचे सांगितले व काय भूमिका घ्यायच,  हे विचारले. अखेर त्यांच्याकडून आम्हाला निरोप आला. आपल्याला जर बैठकीला बोलवले जात नसेल, तर ही निवडणूक भाजप म्हणून लढा, असे आम्हाला सांगण्यात आले. तसेच या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांना देण्यात आली. त्यानंतर मी अर्ज भरला व निवडून आलो,' असे कर्डिले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नगरच्या राजकारणात 'किंग मेकर' म्हणून ओळख असलेले भाजप नेते माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि आज नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनपेक्षित बाजी मारली, व ते स्वतः बँकेचे 'किंग' बनले आहेत. मात्र या विजय मागे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे 'किंग मेकर' ठरले आहेत.

पहा व्हिडिओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने