shivsena: निवडणूक आयोगाच्या निकाला नंतर उद्धव ठाकरे यांची पहिलीच जाहीर सभा.....सर्वांचे लक्ष लागून



ब्युरो टीम: रविवारी रत्नागिरीतील खेडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची दणदणीत आणि खणखणीत जाहीर सभा होणार असून पक्षात झालेल्या गद्दारीनंतर होत असलेल्या व निवडणूक आयोगाने दिलेल्या निकाला नंतर होणाऱ्या या पहिल्याच जाहीर सभेकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. खेड मधील गोलीमार मैदानात सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे.

शिवसेनेत झालेली गद्दारी, शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी, पेंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला ऐतिहासिक निकाल आणि कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा केलेला दारुण पराभव या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची ही सभा होत असून, या सभेत ते काय बोलतात याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे जनतेच्या न्यायालयात जात आहेत. याची सुरुवात कोकणापासून होत आहे. उद्धव ठाकरे कोकणात येत असल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. खेडमध्ये वातावरण भगवेमय बनले आहे. खेडच्या गोळीबार मैदानात रविवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

 

मैदान अपुरे पडेल एवढी गर्दी करा....

खेड हा आपला मतदारसंघ आहे आणि आपलाच राहणार आहे. 5 तारखेच्या सभेला मैदान अपुरे पडले पाहिजे इतकी गर्दी करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी सभेची घोषणा करताना केले होते. हे आवाहन लक्षात घेता गोळीबार मैदानावरील सभेला शिवसैनिकांसोबतच सामान्यांचीही विक्रमी गर्दी लोटणार हे निश्चित आहे. या सभेत माजी आमदार संजय कदम तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करणार आहेत.

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने