नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील रात्री मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या एका गाडीला धक्का मारताना दिसले. कल्याणमधील एका अभियंत्याने ही दृष्य टिपून सोशल मीडियात पोस्ट केले आहे. केतन भोई या कल्याणमध्ये राहणाऱ्या अभियंत्यानं ही पोस्ट केली आहे. भोई यांचे शिक्षण नगरच्या विखे पाटील अभियांत्रिक महाविद्यालयात झालेले आहे. त्यामुळे त्यांनी खासदार डॉ. विखे पाटील यांना ओळखले. भोई लिहितात, ‘आज ऑफिस संपल्यानंतर कॅबने घरी जात असताना अंधेरी येथे ३ लोकं एका गाडीला धक्का देताना दिसले. मुंबईत असे प्रसंग फार कमी वेळा दिसतात त्यामुळे कुतूहलाने बघत होतो. तेवढ्यात लक्षात आलं की अरे यात मध्यभागी तर आपले नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आहेत. पटकन फोटो काढायचा प्रयत्न केला पण नीट फोटो घेता आला नाही. कुठलाही बडेजाव न करता नगरच्या बाहेर स्वतः रस्त्यावर उतरून एका अनोळखी व्यक्तीला मदत करणारे आमच्या नगरचे खासदार आहेत हे बघून अभिमान वाटला. असे खासदार सर्वांना मिळो!’
दरम्यान, भोई यांची पोस्ट वेगानं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी खासदार विखेंच्या या कृतीचे कौतुक केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा