sujay vikhe : आमच्या एवढी मोठी सभा घेऊन दाखवा, खासदार विखेंचे विरोधकांना आव्हान



विक्रम बनकर, नगर : ‘आम्ही रुईछत्तीसी येथे जेवढी मोठी सभा घेतली तेवढी मोठी सभा भारतीय जनता पार्टीचा नेता सोडून इतर कोणत्याही नेत्यानं घेऊन दाखवावी,’ असे आव्हानच भाजप नेते व नगरचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना दिले आहे.  ‘आमच्या एवढी मोठी सभा ते घेऊच शकत नाहीत. कारण मागील तीन वर्षात सत्तेच्या काळात त्यांनी केलेले पाप हे जनतेला माहिती झाल्यामुळे जनता आता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,’ असेही ते म्हणाले.

नगर जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित अशा साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली, तसेच सर्वेक्षणास दोन कोटी रूपयाचा निधी देखील मंजूर केल्या बद्दल, त्यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन काल, रविवार दुपारी एक वाजता  रुईछत्तीसी येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी भव्य मंडप टाकण्यात आला होता. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी भाजप सोडून इतर पक्षातील नेत्यांना एक आव्हान दिलं असून ज्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 

खासदार विखे नेमकं काय म्हणाले?

दोन आठवडय़ांपूर्वी खेडमध्ये झालेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल, १९ मार्चला खेडमध्ये त्याच मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती. त्याबाबत खासदार विखे यांना विचारले असता ते म्हणाले,‘मुख्यमंत्र्यांची सभा ही कोणाला उत्तर देण्यासाठी घेतलेली सभा नाही. तर आता राज्यातील सरकारला नऊ महिने झाले असून गेल्या नऊ महिन्यात जी विकास कामे झाले आहेत, ती जनतेला सांगण्यासाठी अशी सभा घेणे गरजेचे होते. आम्ही सुद्धा रुईछत्तीसी येथे सभा घेतली. या सभेत गेल्या ९ महिन्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यासाठी सरकारच्या माध्यमातून काय विकास कामे केली, महसूल विभाग कसे काम करतो, साकळाई योजना मार्गी कशी लावली, हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत सांगितले आहेच. आमच्या परफॉर्म काय आहे, हे आम्ही सिद्ध केलं असून त्यावरच आम्ही भविष्यात मते मागणार आहोत,’ असेही विखेंनी स्पष्ट केले. 

खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची दोन आठवड्यापूर्वी जी सभा झाली होती त्यावर भाष्य करताना खासदार विखे म्हणाले, ‘त्यांच्या सभेला जी काही गर्दी होती होती ती केवळ व्हिडिओग्राफी व ड्रोन इफेक्टचा फायदा होता. मी आज आव्हान देतो की, आम्ही रुईछत्तीसी येथे जेवढा मंडप व खुर्च्या टाकल्या आहेत, तेवढी सभा भाजपचा नेता सोडून इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी घेऊन दाखवावी. ते अशी सभा घेऊ शकत नाही. कारण तीन वर्षात त्यांनी केलेल पाप हे जनतेच्या पुढे आले असून जनतेला ते माहिती झाले आहे. त्यामुळे जनता त्यांना योग्य ती जागा दाखवेल.’

पहा व्हिडिओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने