Uddhav Thackeray Group : मुख्यमंत्रीपदी मिंधे व उपमुख्यमंत्रीपदी ‘होयबा’… ठाकरे गटाची जोरदार टीका



ब्युरो टीम : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीत हलवलं जात असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाकडूनही आजच्या सामनातील अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.  द्रौपदीचे वस्त्रहरण व्हावे तसे मुंबईचे वस्त्रहरण रोज सुरू आहे. आता येथील वस्त्रोद्योग आयुक्तालयासही पळवून नेले. मुंबईतून सर्व काही ओरबाडून नेणे व त्यातून मुंबई उद्ध्वस्त करणे हाच डाव आहे आणि म्हणून मुख्यमंत्रीपदी एक ‘मिंधे’ व उपमुख्यमंत्रीपदी एक ‘होयबा’ अंध भक्त आणून बसवला, अशी परखड टीका सामनातून ठाकरे गटाने केली आहे.

काय म्हंटल आहे सामनाच्या अग्रलेखात

मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा निर्णय मोदी-शहा यांच्या सरकारने घेतला. विरोधकांनी विधानसभेत प्रश्न विचारले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अंधभक्तास लाजवेल अशी सारवासारव केली. कार्यालय मुंबईतच राहील व वस्त्रोद्योग खात्याचे आयुक्त यापुढे दिल्लीत बसतील. श्री. फडणवीस यांचे हे बोलणे फोल आहे. आयुक्तालयाचा अर्थ शेवटी काय असतो? आयुक्तच कार्यालयात नसेल ते कार्यालय व त्यातील शेपाचशे कर्मचाऱ्यांना काय महत्त्व? वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीमार्गे अहमदाबादेत हलविण्याचा हा डाव आहे. थेट गुजरातेत नेले तर संघर्ष होईल. त्यामुळे आयुक्तांना आधी दिल्लीत नेऊन बसवायचे व सर्व काही शांत झाले की, त्यांची रवानगी गुजरातेत करायची. यापेक्षा वेगळा डाव असूच शकत नाही, पण या महाराष्ट्राच्या नुकसानीवर मुख्यमंत्री काही बोलत नाहीत व उपमुख्यमंत्री थातूरमातूर उत्तर देऊन पळ काढतात. विधानसभेत यावर अधिक आक्रमकपणे घेराबंदी करायला हवी होती. तसे घडलेले दिसत नाही. वाघासारख्या महाराष्ट्राची शेळी करून तिच्या शेपटाशी खेळण्याचे तंत्र दिल्लीने सुरू केले आहे, ते घातक आहे. महाराष्ट्रातून वस्त्रोद्योग आयुक्तालय पळवले व त्या बदल्यात ‘बुकी’ अनिल जयसिंघानीला गुजरातने मुंबईत पाठवले. ‘वॉन्टेड बुकी’ पकडण्यासाठी गृहमंत्र्यांनी जेवढा आटापिटा केला, तेवढा आटापिटा वस्त्रोद्योग आयुक्तालय मुंबईतच ठेवण्यासाठी केला असता तर राज्याचे कल्याण झाले असते. एका फॅशन डिझायनरने गृहमंत्र्यांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबास एक कोटी लाच देण्याची हिंमत दाखवली व त्या प्रकरणात अनिल जयसिंघानीला गुजरातमधून पकडून आणले. म्हणजे येथेही गुजरातचे कनेक्शन आहे. या अनिल जयसिंघानीला नक्की कोणाचे अभय होते हा एक स्वतंत्र, निष्पक्ष चौकशीचाच विषय आहे, पण आता आपल्या राज्यात व देशातही ‘निष्पक्ष’ असे काहीतरी उरले आहे काय? त्यामुळे वस्त्रोद्योग आयुक्तालय गेले व अनिल जयसिंघानी महाशय आले. मुंबईचे चांगले ओरबडायचे व सजवलेले ‘खोके’ भरून कचरा पाठवायचा असे मोदी-शहांचे पक्के धोरण दिसते. देशात जे मुंबईचे महत्त्व आहे, ते कमी करायचे असा विडाच या लोकांनी उचलला आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प आधीच गुजरातला पळवून नेले. मुंबईतील महत्त्वाची कार्यालये हलवली. मुंबई ही यापुढे देशाची आर्थिक राजधानी राहू नये यादृष्टीने मोदी-शहांची पावले पडत आहेत. खरं तर त्यांचा मुंबईच गुजरातला नेऊन जोडायचा डाव होता व आहे. निदान पक्षी मुंबई केंद्रशासित राज्य करून टाकायचे, महाराष्ट्राचा मुंबईवरील हक्कच तोडायचा हे त्यांचे धोरण आहे, पण पाच-पन्नास खोकेवाल्यांनी माती खाल्ली असली तरी मराठी जनता वाघासारखी उसळून झेप घेईल या भीतीने ते पाठीमागून वार करत आहेत. जागतिक नेते पूर्वी हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आले की, त्यांची एखादी भेट मुंबईत होतच असे, पण गेल्या सात-आठ वर्षांत एक तरी प्रमुख जागतिक नेता यांनी मुंबईत अवतरू दिला काय? सर्वच जागतिक नेत्यांना दिल्लीच्या आधी अहमदाबादेत उतरवले जाते ते त्याच हेतूने. मुंबई ही देशातील क्रिकेटची पंढरी, पण पंतप्रधान परदेशी पाहुण्यांसाठी खास क्रिकेट सामन्यांचे आयोजन करतात ते फक्त अहमदाबादेत. हे सर्व ठरवूनच चालले आहे. अगदी या मंडळींनी देशाच्या राजधानीत म्हणजे दिल्लीसही महत्त्व देण्याचे नाकारले. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात व सर्व राज्ये, शहरे त्यांच्यासाठी तितकीच प्रिय असतात, पण सध्याच्या पंतप्रधानांचा खेळच न्यारा दिसतोय. इंग्रज हिंदुस्थानची लूट करून त्यांच्या इंग्लंडमध्ये नेत होते. त्यांचे साम्राज्य जगभरात होते, पण लुटीचा माल मात्र फक्त इंग्लंडच्याच दिशेने जात होता. तसे आपल्या देशात सुरू झाले आहे. सर्व काही फक्त गुजरातमध्ये जात आहे व गुजरातलाच मिळत आहे ही भावना प. बंगालपासून बिहारपर्यंत सगळय़ांची आहे व ममता बॅनर्जींपासून तेजस्वी यादवांपर्यंत अनेकांनी ती बोलून दाखवली आहे. महाराष्ट्राच्या मनातही ती खदखद आहेच. वेदांत-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, टाटा एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून खेचून गुजरातला नेले गेले. मुंबईच्या बीकेसीत होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातमधील गांधीनगरला नेले. अनेक राष्ट्रीय कार्यालये मुंबईतून गेली. एअर इंडियापासून पेटंट डिझाइन ट्रेडमार्क ऑफिसपर्यंत. मुंबईचा हिरे व्यापारही उचलून नेला. द्रौपदीचे वस्त्रहरण व्हावे तसे मुंबईचे वस्त्रहरण रोज सुरू आहे. आता येथील वस्त्रोद्योग आयुक्तालयासही पळवून नेले. मुंबईतून सर्व काही ओरबाडून नेणे व त्यातून मुंबई उद्ध्वस्त करणे हाच डाव आहे आणि म्हणून मुख्यमंत्रीपदी एक ‘मिंधे’ व उपमुख्यमंत्रीपदी एक ‘होयबा’ अंध भक्त आणून बसवला, हे स्पष्ट आहे.

(सौजन्य : दैनिक सामना)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने