ब्युरो टीम : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून पुन्हा सुनावणीला सुरूवात झालीय. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे.
मागील आठवड्यातील सुनावणीत ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी शिवसेनेकडून (शिंदे गट) युक्तिवाद केला होता. आजही त्यांनी युक्तीवादासाठी वेळ मागितला होता. त्यांच्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्याकडून अन्य दोन वकील, ठाकरे गटातर्फे कपिल सिब्बल आणि सॉलिसीटर जनरल यांचेही फेरयुक्तिवाद अजून व्हायचे आहेत. दोन्ही बाजू ऐकून आठवडाभरात सत्तासंघर्षाच्या प्रकरणात निकाल येणार का, याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आज सकाळच्या सत्रातच एकनाथ शिंदे यांचे वकील अॅड नीरज किशन कौल आणि अॅड हरीश साळवे यांनी ठाकरेंना घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनाच घेऊ द्या, अशी आग्रही मागणी एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी केली. ज्याचा अधिकारच नाही, ते काम कोर्टाला करायला सांगितलं जातंय, असं सांगून आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडेच सोपवावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
टिप्पणी पोस्ट करा