Uddhav Thackeray Warn Rahul Gandhi : उद्धव ठाकरेंचा थेट राहुल गांधींना इशारा, म्हणाले,'सावरकरांचा अपमान सहन करणार नाही...'



ब्युरो टीम : मालेगावच्या एमएसजी कॉलेजच्या मैदानावर पार पडलेल्या सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना इशारा दिला आहे. कुठल्याही परिस्थितीत सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'आज मला राहुल गांधींना जाहीरपणे एक सांगायचं आहे, तुम्ही कन्याकुमारी ते काश्मीर चालला. संजय राऊत आणि आम्हीही तुमच्याबरोबर होतो. ही लढाई लोकशाहीची आहे. मात्र, राहुल गांधींना जाहीरपणे सांगत आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत आहे. त्यांचा अपमान पटणारा नाही. लढायचं तर दैवतांचा अपमान सहन करणार नाही. सावरकरांनी १४ वर्षे छळ सोसला. ते सुद्धा एकप्रकारे बलिदान आहे. जसे क्रांतीकारी फाशी गेले, गोळ्या खाऊन बलिदान दिलं. तसेच, १४ वर्षे मरण यातना सहन करण येड्यागबाळ्याचं काम नाही. त्यामुळे राहुल गांधींना सांगतो, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. त्याच्यात फाटे फुटू देऊ नका. मुद्दामन तुम्हाला डिवचलं जात आहे. आता वेळ चुकली, तर आपला देश हुकूमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही,' असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यावर शनिवारी ( २५ मार्च ) राहुल गांधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे, गांधी कधी माफी मागत नाही,’ अशी टीप्पणी केली होती. त्यावरून आज उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना एकप्रकारे इशारा दिलाय.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने