विक्रम बनकर, नगर : 'काँग्रेसवाल्यांकडून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला जातोय. पण त्याच काँग्रेसचे नेते असणाऱ्या राहुल गांधी यांना माफी मागायला लावण्याचे धाडस सुद्धा ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यात दिसत नाही. उलट मातोश्रीवर राहुल गांधी यांना येण्यासाठी पायघड्या घातल्या जातात. ही तर वैचारिक दिवाळखोरी आहे. आता तर उद्धव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल 'सिल्व्हर ओक' वर बसले आहेत,' अशी घणाघाती टीका भाजप नेते तथा महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ते अहमदनगर येथे माध्यमांशी बोलत होते.
'उद्धव ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा विचारही सोडला आहे. त्यांना स्वतःचे मतही राहिलं नाही' असा टोला लगावतानाच राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले,'भारत जोडो यात्रेमधून राहुल गांधी यांना नेमकं काय साध्य करायचं होतं? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करून त्यांना भारत जोडायचा आहे का तोडायचा आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दुर्दैवाने राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेधही उद्धव ठाकरे करीत नाहीत, त्यावरून ही महाविकास आघाडी तत्त्वातून नाही तर व्यक्ती द्वेषातून तयार झाली असंच दिसतंय' असेही विखे पाटील म्हणाले.
'महाविकास आघाडीमध्ये दिवसेंदिवस भविष्यकारांची संख्या वाढत चालली आहे. सत्ता गेल्याच्या वैफल्यातून ते बाहेर पडायला तयार नाहीत. राज्यातील सत्ता जाऊन आपण पुन्हा येऊ, अशी स्वप्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडतात. पण त्यांनी या भ्रमात राहण्यापेक्षा एक प्रबळ विरोधीपक्ष म्हणून काम करण्याची गरज आहे,' असेही ते म्हणाले.
वज्रमुठीला अगोदरच तडे गेलेत
'महाविकास आघाडीची वज्रमुठ केवळ सत्ता गेल्याच्या वैफल्यातून आवळलीजात आहे. पण ही मूठ केव्हा सुटेल, हे ती आवळल्या लोकांनाही कळणार नाही. या वज्रमुठीला अगोदरच तडे गेले आहेत. या वज्रमुठी कडे महाराष्ट्रातील जनता गांभीर्याने पाहत नाही, त्याकडे लक्ष देत नाही. या वज्रमुठीचा काही उपयोग नाही,' असेही मंत्री विखे म्हणाले.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा