Ajit Pawar : तर सावरकरांना भारतरत्न द्या; अजित पवारांचे भाजपला आव्हान



ब्युरो टीम : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यातल्या सरकारवर सडकून टीका केली. तसेच, त्यांनी सावरकर गौरव यात्रेवरुनही सरकारला थेट आव्हान दिले आहे. 'सावरकरांबद्दल आम्हालाही आदर आहे. तुमच्या मनात खरचं आदर असेल तर त्यांना भारतरत्न द्या,' असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

अजित पवार म्हणाले, 'मध्यंतरी काही घटना घडल्या, सावरकरांच्या बाबतीत बोललं गेलं. यानंतर वडिलकीच्या नात्याने मान्यवरांनी त्यांची समजूत घातली आणि प्रकरण शांत केले. त्यानंतरही भाजपचे नेते गौरव यात्रा काढत आहेत. यात्रा काढण्यासाठी विरोध नाही, पण त्यात राजकारण आहे. सावरकरांबद्दल आम्हालाही आदर आहे. तुमच्या मनात खरचं आदर असेल तर त्यांना भारतरत्न द्या,' असे आव्हानच अजित पवार यांनी दिले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. ते म्हणाले, 'मराठवाडा साधू-संतांची भूमी आहे. मराठवाड्याने राज्याला पुढे नेण्यासाठी कार्य केले आहे. देश स्वातंत्र्य झाला, पण मराठवाडा स्वातंत्र्य व्हायला 13 महिने लागले. याच मराठवाड्याच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी फक्त 13 मिनिटे दिली. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याबाबत अधिवेशनात वेळ द्यायला हवा, अशी आमची भूमिका होती. देशाच्या स्वातंत्र्याप्रमाणे या कार्यक्रमालाही वेळ दिला पाहिजे. पण, मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी वेळ दिला नाही.'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने