ब्युरो टीम : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची प्रकरण समोर आलं आहे. शेतीच्या वादातून ही धमकी दिल्याची माहिती मिळाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातल्या निपाणी वडगाव येथील संतोष गायधने या व्यक्तीने १ मे रोजी आपण अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
गायधनी यांचा शेतीचा वाद आहे. यामध्ये प्रशासन आणि तेथील काही मंडळी आपल्यावर अन्याय करीत आहेत, असा त्यांचा आरोप आहे. त्यातूनच हजारे यांना भेटूनही काही उपयोग होत नसल्याने १ मे रोजी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन हजारे यांची हत्या करीन, असा इशारा संतोष गायधनी यांनी दिला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील गायधने यांचे शेतीचे वाद आहेत. तेथील काही मंडळी प्रशासनाशी हातमिळणी करून आपल्या कुटुंबावर अन्याय करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. गावातील सुमारे ९६ जणांनी आपल्याला विविध माध्यमातून त्रास दिला आहे. त्यामुळे आपले कुटुंब भीतीच्या वातावरणात जगत आहे, अशी तक्रार गायधने यांनी केली आहे. त्यासंबंधी त्यांनी पोलीस, प्रशासन, मंत्री आणि हजारे यांनाही निवेदन दिले आहे. मात्र यावर काहीच कारवाई होत नाही, असा त्यांचा आरोप आहे. शेवटी गायधने यांनी राष्ट्रपतींकडे आत्महत्या करण्याची परवानगीही मागितली आहे. हे सर्व सुरू असताना हजारे यांनी हेतूपूर्व यात लक्ष घातले नाही, असाही गायधने यांचा आरोप आहे. त्यामुळे १ मे रोजी राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांची हत्या करणार असल्याचे व्हिडिओत म्हटले आहे.
गायधने यांनी पोलीस अधीक्षकांना उद्देशून सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'मी एक सर्वसामान्य शेतकरी असून माझ्या कौटुंबिक शेतीच्या वादाचे कारणातून माझ्या गटातील ९६ लोकांनी एकत्र येऊन माझ्यावर व माझ्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आणली होती. तसेच एका दलित महिलेवर माझ्यावर खोटी अॅट्रॉसिटीची केस दाखल करण्याचा कट रचला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई न झाल्यास मी १ मे २०२३ रोजी जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची हत्या करेल, याची नोंद घ्यावी. या प्रकरणाबाबत मी सविस्तर तक्रार उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर यांच्याकडे दिलेली आहे याची नोंद घ्यावी, असे गायधने यांनी म्हटले आहे. सोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.
ही पोस्ट केल्यानंतर श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी तातडीने हालचाली करून गायधने याला ताब्यात घेतले. श्रीरामपूर पोलिस ठाण्यात त्याची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा