आम्ही सारेच सावरकर!

 


श्री. अविनाश पराडकर 

            मी सावरकर नाही, मी गांधी आहे, असे बालिश बोबडे बोल उन्मत्त गर्वाने, उपहासाने गर्जले आणि उंटाच्या पाठीवर शेवटची काडी पडली! शिशुपालाचे शंभर अपराध भरले, आणि लोकांनी वळवळणारी शिशू पाल शेपटीला धरून भिरकावून दिली. महाराष्ट्र खवळून उठला. नाईलाजाने का होईना,  ठाकरे सेनेला आणि राष्ट्रवादीला सावरकरांवरची टीका थांबवायचा इशारा त्या वाचाळवीराला द्यावा लागला. माफी मागणार नाही म्हणणाऱ्या एका उर्मटाला त्याने केलेली ट्विट्स स्वतःलाच डिलीट करावी लागली. मग काय? खतम ...बायबाय.. टाटा...गुडबाय...गया!!

वास्तविक मी सावरकर नाही ही एवढ्या माजाने सांगायची गोष्ट असण्याची गरजच नव्हती. सावरकर होणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे, यात शंकाच नाही. आज भाजपासह हिंदुत्ववादी परिवार "होय, मी सावरकर" म्हणत आहेत, त्यामागे उन्माद नव्हे, अभिमान आणि आदर आहे. त्या पवित्र विचारांचा वारसा  आम्ही गर्वाने मिरवू इच्छितो हे ठणकावून सांगण्याची भूमिका यात आहे. यावरून अनेकांनी टीकेचा प्रयत्न चालवला असला, सावरकर विचार पेलवण्याची भाजपाची पात्रता आहे का हे विचारत कंड शमवायचा प्रयत्न केला असला, तरी त्याचे उत्तर अन्य कोणत्याही पक्षापेक्षा सकारात्मकच आहे. किंबहुना, आज काहीजणांवर नाईलाजाने सावरकर विषयात तोंड न उघडायची वेळ आली आहे ती भाजपामुळेच आणि आजवर सावरकरांचा सन्मान मिळवून देण्यासाठी जो काही प्रयत्न झाला आहे, तो ही फक्त भाजपामुळेच! अन्यथा काही पक्ष केवळ सावरकर नावाच्या पाट्याच नव्हे, तर त्यांचे विचारही उखडून टाकण्यासाठी इरेला पेटलेले होते. कसे असतील ते सावरकर? हे कसल्याच महत् आत्म्याशी संबंध नसलेले गांधीच असले पाहिजेत. सावरकरांचा इतका दुस्वास करण्याची गरज ती काय? त्यांना थोडाच कसल्या पंचतारांकीत सुविधांचा हव्यास होता? नजरकैदेच्या नावाखाली ब्रिटिशांच्या राजेशाही पाहुणचाराचा ध्यास होता? नॅशनल हेरॉल्डच्या मालमत्ता दडपण्याचा दांडगा अभ्यास होता? स्वातंत्र्यदेवता असणाऱ्या आईची झोपडी प्यारी होती त्यांना!

नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा

प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी

तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा ।

कुठे रे तुम्ही सांगायला हवे तुम्ही सावरकर नव्हे म्हणून? सावरकर हा धगधगता अंगार होता. तो पदरात बांधून घ्यायला त्या पदराला माईच्या, यमुनाबाईंच्या  सामर्थ्याची ताकद असावी लागते. तरुण नवरा तुरूंगाच्या पलीकडे उभा आहे, जो या जन्मी फिरून पुन्हा भेटण्याची आशा नाही. या सगळ्या धावपळीत छोटा मुलगाही नुकताच मृत्युमुखी पडलेला, आणि त्या प्रसंगी पोरसवदा माई उर्फ यमुनाबाई कुठल्या अनामिक शक्तीने सावरकरांसमोर उभ्या राहिल्या असतील?

 "माई, काटक्या एकत्र करायच्या आणि घरटं बांधायचं, त्या घरट्यात पोराबाळांची वीण वाढवायची ह्याला जर संसार म्हणायचा असेल तर हा संसार कावळे, चिमण्या सगळेच करतात. आपल्या घरट्यापुरता संसार कोणालाही करता येतो, 'आपल्याला देशाचा संसार करता आला यात धन्यता माना'. आणि जगामध्ये काहीतरी पेरल्याशिवाय काही उगवत नाहीच, वर ज्वारीचं कणीसच्या कणीस उभं रहावं, असं जर वाटतं असेल तर एका कणसाच्या दाण्याला जमिनीत गाडून घ्यावं लागतं. तो शेतात, मातीत मिळतो तेव्हा पुढचं धान्य येतं; मग हिंदुस्थानात पुढची चांगली घर निर्माण होण्यासाठी आपलं घर पेरायला नको का! कुठल्या तरी घरानं मातीत गेल्याशिवाय पुढचं चांगलं कसं उगवणार.

माई, आपण आपल्या हाताने आपली चूल बोळकी फोडून टाकलीत. आपल्या घराला आग लावली. उद्या स्वतंत्र झालेल्या भारताच्या प्रत्येक घरातून आपल्याला सोन्याचा धूर बघायला मिळणार आहे. मग सगळ्यांच्या घरातून सोन्याचा धूर यावा, म्हणून आपण आपल्या घराचा धूर नको का करायला?वाईट वाटून घेऊ नका, एकाच जन्मात मी तुम्हाला हा असा इतका प्रचंड त्रास दिला आहे की हाच पती जन्मोंजन्मी मिळावा असे तुम्ही म्हणावे तरी कसे? ह्या जन्मी पुन्हा शक्य झालं तर भेटू, नाहीतर इथेच निरोप!"

हे होते सावरकर! मी सावरकर म्हणताना असतो तो आदर या त्यागाचा, असीम संयम आणि सहनशिलतेचा, धैर्याचा आणि देशासाठी बलिदानाच्या उत्कट भावनेचा! तुजविण जनन ते मरण, तुजसाठी मरण ते जनन, या कोरड्या काव्यपंक्ती नव्हेत, त्यात कोलूच्या मरणयातनेतला वेदनेचा घाम आहे, भोगलेल्या असह्य जुलूमातून सांडलेले रक्त आहे. याची निव्वळ कल्पना यावी, यासाठी "मी सावरकर" च्या भूमिकेत जाऊन प्रामाणिकपणे दोन क्षण त्या अंदमानच्या तुरुंगातल्या वाऱ्यासोबत श्वास घ्यायला हवा! ऐन पारतंत्र्यातही काही "राजबंद्यां"च्या नशिबात ब्रिटिशांचे लाड होते, सुखासीन आयुष्य होते... पण...

स्वातंत्र्यानंतरही ज्यांच्या नशिबी खडतर कष्ट होते, उपेक्षा आणि कैदच होती, ते सावरकर होते. त्या क्रांतीसूर्याच्या तेजाची दाहकता काही दिवाभितांना असह्य होणारी होती. आजही, त्यांच्या वारसांना त्यांचे ते वैचारिक तेजोवलय नकोय! जीव घुसमटतो त्यांचा त्या स्वातंत्र्याच्या विचारात, ज्यात त्यांच्या आस्तित्वाला धोका होता. सावरकर म्हणत होते,

अधमासि अधम या न्यायें ।

रक्षिलें राष्ट्र शिवरायें ।

राष्ट्ररक्षका सावध रे रिपु हुडकित तुज आला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

राष्ट्ररक्षक सावध होणे ज्यांच्या स्वार्थी वृत्तीला परवडणारे नव्हते, शिवरायांच्या विचारावरचा पडदा उठवणारे नेतृत्व ज्यांना नको होते, त्यांना सावरकर नको होते. त्यांचे अस्तित्व आणि नामोनिशाण मिटवण्यासाठी त्यांनी जंगजंग पछाडले. आज सावरकरांचे नाव आणि नकाशावरून अंदमानचे अस्तित्व पुसून टाकण्यात कदाचित काँग्रेसी नेते यशस्वीही झाले असते, पण... ते नियतीला, यमुनाबाईंच्या पुण्याईला आणि भारतीय जनता पार्टीच्या संघर्षात मान्य नव्हते, हेच खरे होते.

कदाचित, हीच आपली शेवटची भेट असे सावरकरांनी म्हंटल्यावर पायातले त्राण जात मटकन खाली बसलेल्या विशी- पंचवीशीतल्या माईने स्वतःला आवरले..  सावरले... तुरुंगाच्या जाळीतून हात सावरकरांच्या पायाला लावले...ती धूळ आपल्या मस्तकी लावली. माई काय करता या सावरकरांच्या प्रश्नावर माई उत्तरल्या, "हे पाय बघून ठेवते. पुढल्या जन्मी चुकायला नकोत म्हणून. आपल्या घराचे संसार करणारे खूप पाहिले, पण एवढा मोठा देशाचा संसार करणारा पुरुषोत्तम देवाने मला माझा नवरा म्हणून दिला, मला नाही वाईट वाटत कसलंही! तुम्ही सत्यवान असाल तर मी ही सावित्री आहे, माझ्या तपश़्चर्येनं यमापासून तुम्हाला मी परत आणेन यावर विश्वास ठेवा. स्वतःच्या जीवाला जपा, आम्ही या ठिकाणी तुमची वाट पाहत राहू."

तो विश्वास तेव्हाही सत्यात उतरला आणि आजही उतरतोय.  सावरकरांच्या अस्तित्वावर घातले जाणारे घणाचे घाव तेवढ्याच ताकदीने टणत्कार करत आहेत. त्या घावातून पुन्हा सावरकरांच्या जयघोषाचे नाद मनामनातून दुमदुमले. मी सावरकर म्हणत शेकडो मनगटे पुढे सरसावली आहेत, त्यावर त्या काळकोठडीतल्या लोखंडी बेड्याचे वळ आहेत, कोलू फिरवत असतान लागलेल्या तहानीवर पाण्याऐवजी उठलेले आसूड आहेत आणि त्याहीपेक्षा अधिक म्हणजे .... नादानांच्या उपेक्षेचे, अपमानाचे सल आहेत, जे ओरडून सांगू इच्छितात, आम्ही गांधी नाही!! आम्ही गांधी नाही!! आम्ही गांधी नाही!!!

फक्त तो शब्दांचाही विटाळ जिव्हेला नको, म्हणून हे लाखो आवाज त्याच सागराच्या गर्जनेसम निनादत आहेत...

"....होय, मी सावरकर! मी ही सावरकर!! आम्ही सारेच सावरकर!!!"

( लेखक हे भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आहेत )

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने