ब्रिटिशांच्या साम्राज्याचे डोळे दिपवणारा दाहक क्रांतीसूर्य

 


ब्रिटिशांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नाही असे म्हंटले जायचे. यात काल्पनिकता होती असे म्हणणे सर्वथैव चुकीचे ठरेल. कारण तो सूर्य झाकण्यासाठी केलेले ब्रिटिशांचे सगळे यत्न वाया गेले. खुद्द त्या साम्राज्याच्या उरावर, केंद्रबिंदू लंडनमध्ये तळपत सततच्या दाहकतेचा भोग ब्रिटिशांच्या नशिबी यायला लावणारा तो तेजस्वी क्रांतीसूर्य होता, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! 

सूर्याचे तेज जसे झाकता येत नाही, तसे या क्रांतिसूर्याचे विचारही कधी लपून राहीले नाहीत. अहिँसक मार्गाने आणि ब्रिटिशांसारख्या धूर्त-घातक शत्रूवर प्रेम करून देशाला स्वातंत्र्य मिळेल असल्या बुळचट कल्पनांवर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी ते असणेच शकू नव्हते. अधमासी अधम या न्याये, रक्षिले राष्ट्र शिवराये, या त्यांच्या शब्दांमधूनच त्यांची विचारधारा पुरेशी व्यक्त होऊ शकते. अधम ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी सगळ्या गनिमी काव्यांचा वापर करण्याची प्रेरणा या दोन ओळीतून त्यांनी घेतलेली दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आदिलशाही फौजांशी लढताना त्यांना एकाकी पाडण्यासाठी औरंगजेबाशी पत्रव्यवहार करत संबंध चांगले केलेच होते. अगदी आग्र्याहून सुटका झाल्यावर "आमचे मनात आपल्याबद्दल यत्किंचितही वैरभाव नाही, घडले ते ईश्वरेच्छा" म्हणत जो सलोखा साधला, याला मुत्सद्दीपणाने आखलेल्या चाली म्हणतात. अर्थात ज्यांना आयुष्यात सत्याग्रह म्हणजे सत्तेचा आग्रह इतकेच कळले, त्यांच्या बालबुद्धीला सावरकर कसे कळावेत? त्यांना माफीवीर समजण्याइतकीच त्यांची बौद्धिक कुवत!

अर्थात, मंदबुद्धी आणि सूडबुद्धी अशा दोन्ही लोकांना प्रकारच्या लोकांना सावरकर कळले नसले, तरीही ब्रिटिशांना स्वातंत्र्यवीर सावरकर पुरते कळले होते. तब्बल ५० वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा ब्रिटिशांनी फर्मावणे हा त्यांच्या क्रांतीकार्याला त्यांनी केलेला सलामच म्हणावा लागेल. अन्यथा बाकी अनेक महान नेत्यांना आलिशान सुविधा आणि मानधन देत त्यांची किंमत ब्रिटिशांनी निश्चित केली होती. इतिहास साक्षी आहे.

‘देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन’ अशी प्रतिज्ञा घेतलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना सडत मरण्यापेक्षा त्यासाठी सर्वात प्रथम अंदमानच्या सेल्युलर जेलमधून बाहेर पडणे गरजेचे होते. ११ वर्षांच्या मरणयातना भोगत असलेल्या या महाप्रचंड प्रतिभा लाभलेल्या या बुद्धीवंताने त्यासाठी मुत्सद्दी राजकीय कुटनीती वापरत ब्रिटीशांशी आपण सामोपचाराने वागत असल्याचे दाखवत ब्रिटिश सरकारने ठेवलेल्या काही अटींचा स्वीकार करत डाव यशस्वी केला. त्यांना मुक्त करण्याची ब्रिटिश प्रशासनाची जराही इच्छा नसली तरी स्वतःच्याच न्यायपद्धतीला डावलणे त्यांना शक्य झाले नाही. अटीनुसार, सावरकरांना कोणत्याही राजकीय कार्यात त्यापुढे सहभाग घेता येणार नव्हता. साहजिकच, सावरकरांचे रत्नागिरीतले क्रांतीकार्य अनेकदा इतिहासाला देखील ज्ञात होऊ शकले नाही.

रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना त्या ब्रिटिशविरोधी कामाची कल्पना प्रशासनाला होती, पण सावरकरांनी कोणताही पुरावा कधी हाती लागू दिला नाही, तब्बल पाच वेळा त्यांच्या नजरकैदेत वाढ केली गेली, त्यांना गुन्ह्यात अडकविण्यासाठी खटाटोप केले गेले, पण सारेच व्यर्थ ठरले. सावरकरांची सुटका म्हणजे आपल्या साम्राज्यावर केवढे मोठे संकट आहे, याची जाणीव ब्रिटिशांना पदोपदी होती. त्यामुळे काहीही करून त्यांना एखाद्या गुन्ह्यात अडकवून पुन्हा अंदमानात पाठवण्यसाठी हरएक मार्गे प्रयत्न सुरू होते.त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष राहावे यासाठी रत्नागिरीतील निवासस्थानी खडा पहारा बसवला गेला होता. एकीकडे सावरकर सामाजिक कार्यात झोकून देत असले, तरीही त्यांना अपेक्षित खरे काम मात्र कधीही थांबले नव्हते. ब्रिटिशांच्या विरोधातला लाव्हा खदखदता होता. योग्य व्यक्तींना गुप्तपणे बॉम्बस्फोट करण्याचे आणि बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण त्यांनी दिल्याचे त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी आता मान्य केले आहे. वामनराव चव्हाण, वासुदेव बळवंत गोगटे, वासुदेव पवार, अण्णा कासार, वासू हर्डीकर यासारख्या निधड्या छातीच्या विश्वासू साथीदारांच्या माध्यमातून  सशस्त्र क्रांतीची आग पेटत राहिली होती. त्या आगीत ताकद एवढी होती की अनेकदा जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनातही आपल्याला साथ देणारी माणसे त्यानी निर्माण केली होती. दुसरीकडे सावरकरांना पुन्हा एखाद्या गुन्ह्यात अडकवून अंदमानात पाठविण्यासाठी प्रयत्न करणार्‍यात जिल्हाधिकारी गिलिगन व जिल्हा पोलीस अधिकारी ओ’सलीवन सतत त्यांना गुन्ह्यात अडकवण्यासाठी प्रयत्न करतच होते. मोठी यंत्रणा त्यासाठी राबत होती. जर सावरकर ब्रिटिशांचे झाले असते, तर या सगळ्या खटाटोपाची गरज तरी होती का? पण... फक्त बदनामीतून त्यांचे कार्य पुसण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या गुलामी मनोवृत्तीच्या काही नेत्यांना आणि काँग्रेसीजनांना त्याच्याशी मतलब असण्याचे कारणचं असू शकत नाही.

सावरकरांच्या कारनाम्यांचा पुरावा जरी ब्रिटिशांना जंगजंग पछाडूनही मिळत नव्हता, तरीही परिणामांची धग मात्र सातत्याने पोळायला लावत होती. का कोण जाणे, पण त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकात क्रांती घडवून आणण्यासाठी होणारा बदल निर्णायक ठरायचा. पृथ्वीसिंग आझाद हे सावरकरांचे अंदमानातील सहकारी. त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांच्या विचारात बदल झाला होता. त्यांनी गांधीजींची भेट घेऊन आपण आपण अहिंसेतून देशसेवा करणार असल्याचे ठरविले होते. पुढे रत्नागिरीत त्यांची सावरकरांशी भेट झाली आणि वाघाने गवत खायचा निर्णय बदलून टाकला.पृथ्वीसिंग पुन्हा सशस्त्र क्रांतीकारक बनले. सेनापती बापटांनीसुद्धा गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने चालण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा त्यांची रत्नागिरीत सावरकरांशी भेट झाली तसा त्यांच्यातला सशस्त्र क्रांतीकारक वाघ डरकाळी फोडत हॉटसनवर गोळीबार करणार्‍या वासुदेव बळवंत गोगटेंचे अभिनंदन करण्यावर उतरला. “गोगटेंनी निवडलेला हाच मार्ग योग्य असून केवळ याच मार्गाने ब्रिटिशांना  देशातून हुसकावून लावावे लागेल" असे त्यांनी आपल्या भाषणात सुनावले. त्यांना त्याबद्दल सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली. मात्र, सावरकरांच्या भेटीनंतर अशी कोणती प्रेरणा अशा शेकडो तरुणांना मिळत होती, ज्यातून अहिंसक मार्ग सोडून ते सशस्त्र क्रांतीकार्याकडे वळत होते सहभागी होत होते? याचे उत्तर इतिहासालाही मिळाले नाही, आणि म्हणूनच कदाचित त्या पोलादी गुप्ततेची क्षमता ओळखण्यासाठी कमी पडलेले वैचारिक दिवाळखोर त्यांना माफीवीर म्हणायला धजावत असावेत.

सॅण्डर्स या पोलीस अधिकार्‍याने केलेल्या क्रूर लाठीहल्ल्यात लाला लजपतराय यांचा मृत्यू ओढवला. त्यांच्या शोकसभेत मोघे नावाचा एक तरुण आगीसारखा बरसला. लालाजींच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी त्याच पद्धतीने क्रांतीयुद्धात उतरा, असे धगधगते आवाहन त्यांने देशातील तरुणांना केले होते. त्या शब्दातील आग ही शब्द शब्द सावरकरांची होती, हे जगाला कळले तरीही सावरकरांना थेट घेरणे ब्रिटिशांना कायदेशीरदृष्ट्या शक्य नव्हते. पुढे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी सॅण्डर्सला ठार करत त्या हत्येचा सूड घेतला. गांधीजीं हत्येच्या घटनेचा निषेध करत दु:ख व्यक्त केले  ‘ही हत्येची ब्याद’ या शब्दात लेख लिहून क्रांतीकारकांवर ताशेरे ओढले. तेव्हा मात्र त्याला प्रत्युत्तर देत सावरकरांनी आपल्या वृत्तपत्रातही ‘सुडाची ब्याद की हत्येची ब्याद’ असा अग्रलेख लिहित क्रांतिकारकांची बाजू उचलून धरली होती. या तिघा क्रांतीकारकांना ब्रिटिशांनी फाशी दिल्यानंतर तात्यारावांनी आपल्या घरावरील भगवा ध्वज उतरवून काळा झेंडा फडकावीत या घटनेचा व ब्रिटिश सरकारचा निषेध व्यक्त केला होता. तात्यारावांनी आपल्या ‘श्रद्धानंद’ वृत्तपत्रामधून चितगाव शस्त्रागारावर हल्ला करणार्‍या क्रांतिकारकांचेही समर्थन केले. देशवीर रामप्रसाद बिस्मिल यांच्यावर श्रद्धांजलीपर लेख व काकोरी कटातील अश्फाकउल्ला यांच्या समर्थनात लेख लिहिले होते. त्यामुळे ब्रिटिश सरकारने ‘श्रद्धानंद’वर बंदी घातली. अंदमानातून काही अटी मान्य करून कैदेतून सुटून आल्यानंतरही सावरकरांचे खरे अंतरंग झाकून ठेवता आले नव्हते. वरती राख धरली तरी निखारा विझला म्हणणे धारिष्ट्याचे ठरते. 

१९२४ मध्ये रत्नागिरीत प्लेगची साथ आलेली असल्यामुळे सावरकरांना नाशिकला पाठविण्यासाठी आले. नाशिकला ते ज्या तरुणांच्या सहवासात आले त्यानी पुढे काही काळातच मीरतचा कट घडवून आणला, हा निव्वळ योगायोग असावा? साहजिकच, नाशिकच्या जिल्हाधिकारी बेटसने आठवड्याच्या आत पुन्हा रत्नागिरीत परत पाठवले. गुप्तचर खात्याच्या उपमहानिरीक्षकाने १९२९ मध्ये सावरकर हिंसक कारवायात सहभागी असल्याची तक्रार दिली. गोलमेज परिषद सुरु असताना सावरकर ‘कृष्णशिष्टाई’ या विषयावर भाषण देत होते, जो गोलमेज परिषदेला घातक ठरत होता. त्याबद्दल पुन्हा त्यांना ताकीद देण्यात आली. एकीकडे त्यांचे सामाजिक कार्य सुरूच होते, मात्र तरीही शेकडो वेळा सावरकरांच्या घराची झडती पोलिसांककडून घेतली जात होती. देशात कुठेही काही क्रांतीकारक धमाका घडला की सावरकरांभोवतीची पकड आणखी घट्ट व्हायची. ब्रिटिशांची ही भीती कधीच कमी झाली नाही. लाखो प्रयत्न करूनही हे तेजोवलय त्यांना झाकता आले नाही. या सूर्यावर थुंकण्याची नवगांधीगिरी काही मूढ आजकाल करू लागले आहेत. परिमाण, स्वच्छपणे दिसू लागले आहेत. त्यांची स्वतःची तोंडे त्यात रंगली, बेताल वक्तव्ये स्वतःहून डिलीट करावी लागली आणि "मी सावरकर" म्हणणाऱ्या लाखो युवा वर्गाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यह तो होनाही था! महाबलाढ्य ब्रिटिशांना सतत सलणारा हा स्वातंत्र्यवीर सावरकर नावाचा क्रांतिसूर्य जिथे ब्रिटिश साम्राज्यावरून यत्किंचितही ढळला नाही, तिथे त्याच्या तेजावर शिंतोडे उडवायला निघालेल्या काही कर्मदारिद्र्यांची गत ती काय वेगळी होणार? सावरकर हा हिंदुस्थानच्या नसानसातून वाहणारा केसरी विचार आहे, आणि त्यातूनच त्यांच्या अपमानाने व्यथित झालेल्या चेहऱ्यावर आज "मी सावरकर" ही तप्त प्रतिमा उमटलेली आहे. मी सावरकर नाही, असे तेच म्हणू शकतात, ज्यांच्या रक्तातून अजूनही ब्रिटिशांची गुलामी वहात आहे. बाकी सगळे स्वातंत्र्यवीरांचा विचार जागवण्यासाठी राख फुंकून टाकत पुन्हा फुलून उठलेले निखारे आहेत, होय... ते सारेच आज सावरकर आहेत! अनादी...अनंत... अवध्य असे, "मी सावरकर", ज्यांची मनगटे बेताल वाचाळवीरांना उघडपणे आव्हान देत आहेत--

अनादी मी... अनंत मी...  अवध्य मी भला.…!!

मारील रिपू जगती असा... कवण जन्मला...??

 -----अविनाश पराडकर, प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने