विक्रम बनकर, नगर : 'अलीकडच्या काळामध्ये राजकारणात काही कुस्त्या चालल्या आहेत. राजकारणात सकाळी नऊ वाजता काही लोक नशा करून राजकीय कुस्ती खेळण्याचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीतून बादच व्हावं लागतं,' असा घनाघात करत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे नेत्यांवर निशाणा साधला.
अहमदनगर येथील वाडीया पॉर्क माळीवाडा जिल्हा क्रीडा संकुल येथे छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचा पारितोषिक वितरण फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. 'जे अस्सल मातेतील पहिलवान असतात, तेच खऱ्या अर्थाने कुस्ती जिंकतात. तुमच्या आशीर्वादाने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच कुस्ती जिंकली आहे 2024 मध्ये आम्ही पुन्हा कुस्ती जिंकू,' असेही फडणवीस म्हणाले. 'अहमदनगर मधील वाडिया पार्क येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल,' अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. यावेळी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी मान्यवर तसेच कुस्ती पंच, विविध क्षेत्रातील पदाधिकारी व जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले की, 'कुस्ती हा आपला प्राचीन खेळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम खऱ्या अर्थाने या खेळाला राजाश्रय दिला. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्तीला पाठबळ दिले. बंद पडलेल्या तालीम पुनरूज्जीवीत करण्याचे काम शाहू महाराजांनी केले. शाहू महाराजांनी कुस्ती विजेत्यांना चांदीची गदा देण्याची परंपरा सुरू केली. आज अहमदनगर मध्ये सोन्याची गदा देण्याच्या परंपरेला सुरूवात झाली ही आनंदाची गोष्ट आहे.भारतासाठी पहिले ऑलिंपिक पदक पैलवान खाशाबा जाधव यांनी पटकाविले त्यानंतर पदक मिळाले नाही. पुढील ऑलिंपिक विजेता महाराष्ट्राच्या मातीतूनचं झाला पाहिजे,' अशी अपेक्षा फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली . ते पुढे म्हणाले की, 'कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पैलवानाचे मानधन ३ हजारांहून १८ हजार वाढविले. तीन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेल्या विजय चौधरी यांना थेट पोलीस उपअधीक्षक पदाची नोकरी देण्यात आली.'
दरम्यान, या स्पर्धेतील ३५ लाख रूपये किंमतीची अर्धा किलोच्या सोन्याची गदा सोलापूरचे महेंद्र गायकवाड यांनी पटकावली. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये अंतिम सामना झाला. दोन दिवस चाललेल्या या कुस्ती स्पर्धांसाठी राज्यभरातून जवळपास एक हजार कुस्तीपटू सहभागी झाले होते.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा