Donald Trump : अटकेवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...



ब्युरो टीम : 'अमेरिकेत असं काही घडले, असं कधीही वाटलं नव्हतं. मी केवळ एकच गुन्हा केला, तो म्हणजे ज्यांनी आपला देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला मी त्यांचा निर्भयपणे सामना केला. सुरुवातीपासून डेमोक्रॅटिक पक्षाकडून माझ्या प्रचार मोहिमेवर पाळत ठेवण्यात आली,' अशी प्रतिक्रिया पॉर्न स्टारला पैसे दिल्याप्रकरणी अटकेवर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली. न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार प्रकरणात फौजदारी खटला चालवण्यास मान्यता दिली. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना अटक झाली. अटक झालेले डोनाल्ड ट्रम्प हे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले. गुन्ह्यांच्या आरोपांना सामोरे जावे लागलेले ते पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले. एक तासाच्या सुनावणीनंतर ट्रम्प यांना जामीन मिळाला. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया दिली.

ट्रम्प म्हणाले,'तुम्हाला आठवत असेल, त्यांनी माझ्याविरोधात खोट्या प्रकरणांमध्ये चौकशा लावत हल्ला केला. बेकायदेशीर आणि असंवैधानिक छापे टाकण्यात आले. ते न्यायालयाशी खोटं बोलले. एफबीआय आणि इतर तपास संस्था रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांवर हेतूपूर्वक कारवाया करत आहेत. निवडणूक नियमांमध्ये असंवैधानिक बदल करण्यात आले. यात निवडणूक आयोगाला राज्य विधिमंडळाकडून परवानगीची गरज नाही, अशी तरतूद करण्यात आली.निवडणुकीत बेकायदेशीरपणे झालेलं बोगस मतदान सरकारी कॅमेऱ्यांसमोर झालं. नुकतेच एफबीआयने ट्विटर आणि फेसबूकला बायडन कुटुंबाचा पर्दाफाश करणाऱ्या लॅपटॉपविषयी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर काहीही येऊ नये असं सांगितलं,' असाही आरोप ट्रम्प यांनी केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने