महेंद्र मिसाळ (श्रीगोंदा): प्रत्येक मनुष्यच्या जीवनात संघर्ष हा असतोच. कधीकधी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते व मग संकटे पुढे उभी राहतात.अशा संकटात काही व्यक्ती या निराश होवुन परिस्थितीपुढे गुडगे टेकतात. परंतु काही व्यक्ती या संकटात संधी शोधतात व संकटाशी लढा देवुन असे महान कार्य करतात कि जगात त्यांचे नाव अजरामर होते. असेच एक रत्न या भारतभुमीत जन्मले ज्यांना जन्मापासूनच अतीशय प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करावा लागला. पण ते आपल्या अफाट बुद्धीच्या जोरावर व सामाजिक कार्यातून जगाच्या पटलावर विश्वरत्न म्हणून उदयास आले. या महापुरुषाचे नाव होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या महान कार्यास उजाळा.
त्या काळात सर्वत्र जातीभेद, धर्मभेद पसरले होतें. समाजात उच्च नीच, काळा गोरा असे भेद होतें. चार वर्णा मधून चार हजार जाती निर्माण झाल्या होत्या. समाजात अंधश्रद्धा वाढलेली होती.कर्मकांड वाढली होती. देवाच्या नावाने भोंदू भोळ्या भाबड्या लोकांना लुटत होते. दलित कुटुंबांत जन्मास आले म्हणजे खुपच कठीण जीवन जगावे लागत होते. अस्पृशयांना कुठलेच अधिकार नव्हते. पोटाला पोटभर अन्न नाही, अंगात वस्त्र पुरेसे नाही, शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, गरिबी दारिद्रय पाचवीला पुजलेली, रस्त्याने चालणे, सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यास बंदी, मंदिरात प्रवेशबंदी, ज्यांची सावली हि अस्पृश्य समजून उच्चवर्णीयाना विटाळ होत असत. पशू प्राणी सुखी होती पण दलित लोक दुःखात जीवन जगत होते. माणसांना माणसांची आठवण उरली नव्हती.माणुसकी नष्ट झाली होती.अशा दलित कुटुबांत बाबासाहेबांचा जन्म झाला होता. बाबासाहेबांना जातीव्यवस्थेचे चटके बालवयात बसु लागले. बाबासाहेबांना शाळेत अस्पृश्य म्हणून वर्गाच्या बाहेर बसवण्यात येई.
शिक्षक त्यांच्या वह्या, पुस्तकांना स्पर्श करत नसत. पाणी पिताना वरुन कोणीतरी त्यांच्या ओंजलीत पाणी टाकत असे. पुणे येथे पेशवाईत तर अस्पृष्य व्यक्तीला रस्त्याने जाताना गळ्यात मडक व कंबरेला झाडू बांधून जावे लागत होते. या भयानक स्थितीत दलित माणसे गुन्हेगारा प्रमाणे जीवन जगत होते. एकदा बाबासाहेबांना शाळेत शिक्षकाने गणित सोडवण्यासाठी वर्गात बोलावले. बाबासाहेब फळ्याकडे येवू लागताच वर्गातील इतर मूले हि ओरडत फळ्याकडे धावू लागली कारण फळ्याच्या पाठीमागे मुलांचे जेवणाचे डब्बे होते व जर
बाबासाहेबांची सावली हि डब्यावर पडली तर जेवणाचे अन्न हे अपवित्र होईल म्हणून मुले पळू लागली. या घटनेचा परिणाम बाबासाहेबांवर खोलवर झाला. बाबासाहेब शाळेत हुशार होते.घरी अठराविश्व दारिद्र्य असूनही बाबासाहेब हे शिकून उच्च शिक्षित झाले.रोज अठरा तास अभ्यास बाबासाहेब करत. प्रचंड पुस्तके वाचनाची आवड बाबासाहेबांना होती.त्यांनी त्यांच्या घरात ग्रंथालय बनवले होते.दलित कुटुंबात जन्मलेला हा मुलगा भारताची राज्यघटना लिहिल असे कोणाला वाटले नव्हते. बाबासाहेबांनी अखंड परिश्रम करून ज्ञान मिळवले. त्या काळी बाबासो सर्व नेत्यांमध्ये उच्चशिक्षित व्यक्ती होते.ज्या समाजाची नेहमीच उच्चवणीयांनी हेळसांड केली. ज्या समाजाला पशुपेक्षाही वाईट वागणूक मिळाली त्या समाजातून बाबासाहेब हे एक भारतरत्न निर्माण झाले. "प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून यश कसे मिळवावे याचे चालते-बोलते विद्यापीठ म्हणजे बाबासाहेब होय." स्वतःची चार मूले वारली हे दुःख मनात ठेवून हा योद्धा आपल्या दलित बांधवाची दुःखे दुर करत होता. अस्पश्याना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवुन देण्यासाठी बाबासाहेबानी कायम लढा दिला. नाशिक येथे काळाराम मंदिर येथे लाखो अस्पृश्यना सोबत घेवुन मंदिर प्रवेश घडवून आणला. तसेच महाड येथे बाबासाहेबांनी चवदार तळे सत्याग्रह करत समतेचे पाणी सर्वांनाच पाजले. या महामानवाने " द अनटचेबल्स "शूद्र कोण होते" ""द बुद्ध अँड हिज धम्म" या ग्रंथातून अन्ययाय विरोधात आवाज उठवला. प्रोब्लम, ऑफ द रुपी हा ग्रंथ लिहला त्या ग्रंथा आधारे RBI बँकेची स्थापना केली गेली. त्यांनी "पीपल्स सोसायटी" "स्वतंत्र मजूर पक्ष" याची स्थापना केली. त्यांनी जातीव्यवस्थेचे समर्थन करणारी मनुस्मृती ग्रंथांचे दहन केले. त्यांनी लाखों अनुयायी सोबत बुद्ध धर्मात प्रवेश केला. त्यांची उच्च बुद्धिमत्ता व सामजिक कार्य पाहून त्यांना मजूरमंत्री व कायदेमंत्री बनवले. दलीत कुटुंबात जन्म झालेला बाबासाहेबांचा हा प्रवास थक्क करणारा होता." शिका संघटित व्हा व संघर्ष करा" असा उपदेश त्यांनी आम्हाला दिला आहे."बाबासाहेब हे जातीव्यवस्थेची कोथळा बाहेर काढणारे वाघनखेच होते." खरं तर बाबासाहेबांच्या विचारांची आज समाजाला गरज आहे.आज समाजात छोट्या-छोट्या संकटाने युवक, शेतकरी आत्महत्या करत आहेत.त्यांच्या साठी बाबासाहेबाचा संघर्ष हा प्रेरणादायी ठरेल. आज समाजात विविध गट-तट पडले आहेत. सध्या जाती-धर्मावरुन, विविध रंगावरून आम्ही एकमेकाशी लढत आहोत व आपलेच रक्त सांडत आहोत.युवकांच्या हाती दगडे काठ्या न देता बाबासाहेबांचे चरित्र वाचण्यास द्या. बाबासाहेबांचे विचार जर आम्ही कृतीत जगलोत तर नक्कीच जीवन यशस्वी होईल यात शंका नाही. बाबासाहेबांचे पुतळे डोक्यावर घेवून नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेवुन जगा.आपण सर्वांनीच बाबासाहेबांची जयंती हि नाचून नाही तर वाचून साजरी करुया.बाबासाहेबांच्या मनातील समतेचा, बंधुतेचा भारत निर्माण करण्यासाठी आपण आपसातील भेदभाव नष्ट करून समतेचा प्रचार प्रसार करुया. तरच खऱ्या अर्थाने जयंती साजरी केल्याचे सार्थकी लागेल.
लेखक- महेंद्र जनार्दन मिसाळ 9850392414
टिप्पणी पोस्ट करा