Government job :राज्याच्या मुख्य सचिवपदी बसणार महिला? सुजाता सौनिक यांची वर्णी लागण्याची शक्यता

 


ब्युरो टीम: मुंबईच्या पालिका आयुक्त पदापासून पोलीस आयुक्त आणि राज्याच्या मुख्य सचिव पदावर आतापर्यंत एकाही महिला अधिकाऱयाची नियुक्ती झालेली नाही.सध्याच्या मंत्रिमंडळातही महिला लोकप्रतिनिधीला स्थान नाही. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव महिनाअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार सुजाता सौनिक मुख्य सचिव पदाच्या पहिल्या क्रमांकाच्या सनदी अधिकारी आहेत. पण आजवरचा इतिहास पहिल्यावर राज्य सरकार सुजाता सौनिक यांना मुख्य सचिव पदाची संधी देणार का याकडे प्रशासकीय सेवेतील महिलांचे लक्ष लागले आहे.

राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव येत्या 30 एप्रिलला निवृत्त होत आहेत. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक या सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्याचबरोबर वित्त व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक हेही दावेदार आहेत. प्रशासकीय सेवेत सुजाता सौनिक व मनोज सौनिक हे पती-पत्नी राज्याची सेवा बजावत आहेत. मनोज सौनिकही अतिशय हुशार अधिकारी आहेत. या पदासाठी पती-पत्नीमध्ये स्पर्धा नसली तरीही महिला म्हणून मुख्य सचिव पदावर सुजाता सौनिक यांना संधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण महिलांना डावलल्याचा इतिहास आहे.

आतापर्यंत मुंबई महापालिका, पोलीस आयुक्त व राज्याच्या मुख्य सचिव पदावर कधीही महिलांची नियुक्ती झालेली नाही. सनदी सेवेतील नीला सत्यनारायण, चंद्रा अय्यंगार व मेधा गाडगीळ यांना कधीही मुख्य सचिवपदाची संधी दिली नाही. मुंबई पोलीस दलातील तत्कालीन सहपोलीस आयुक्त मीरा बोरवणकर या मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाच्या स्पर्धेत होत्या. त्यांची नियुक्ती पुणे पोलीस आयुक्त म्हणून झाली. पण मुंबई पोलीस आयुक्तपदाची संधी दिली नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने