ब्युरो टीम :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, जिल्हा रुग्णालय,अहमदनगर ,अहमदनर बार असोसिएशन ,सेंट्रल बार असोसिएशन, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सुधाकर यार्लगड्डा, प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश, अहमदनगर हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कोरोनाच्या काळातील विस्फोटक परिस्थितीला प्रत्येक आरोग्य कर्मचारी, अधिकारी ,सेवक यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता यशस्वीरित्या प्रयत्न केले याबद्दल कौतुक केले. मोबाईलच्या , सोशल ॲपच्या दुनियेतून बाहेर येऊन प्रत्येकाने आपण समाजाचे काही देणे लागतो अशा रीतीने जगले पाहिजे असे त्यांनी सांगितले. मनाची उदारता मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवते असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शासकीय रुग्णालयातील सेवांवर विश्वास ठेवला पाहिजे हे सांगितले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर श्रीमती. भाग्यश्री का. पाटील यांनी करत जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेताना मनाची देखील काळजी घेतली पाहिजे. स्वतःचा विचार करून व्यक्ती केंद्रित न राहता समाज केंद्रित बनले पाहिजे, असे सांगितले. त्याचप्रमाणे न्यायबंदी व फौजदारी प्रकरणातील आरोपी यांच्या मदतीसाठी लोकअभिरक्षक कार्यालय जिल्हा न्यायालयामध्ये आहे, ज्याची कल्पना उपस्थितांना दिली.
मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी आपल्या भाषणात जागतिक आरोग्य दिनानिमित्त दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना वर्षभरात जाणवणाऱ्या अडचणी व समस्या लक्षात घेऊन एक विषय (थीम) बनवत असते. जागतिक आरोग्य संघटनेने सन 1948 मध्ये मागील वर्षातील स्वास्थ्याचा आढावा घेऊन पुढील वर्षासाठी काय उपाययोजना करणे इष्ट ठरेल असा ठराव करण्याचे प्रायोजित केले होते,असे सांगून आपण आपल्या शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य जपले पाहिजे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमात जिल्हा मानसिक आरोग्य अधिकारी मा. डॉ. तेजस्विनी मिस्किन यांनी मन आणि व शरीर दोन्ही निरोगी असेल तरच आपण निरोगी आहोत असे समजले जाते. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःसाठी दररोज वेळ काढून ध्यान धारणा केली पाहिजे, आपल्या आवडीचे छंद जोपासले पाहिजे जेणेकरून मन व शरीर प्रसन्न राहील असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश आहेर यांनी केले तर आभार प्रदर्शन अँड कश्यप तरकसे यांनी केले. कार्यक्रमास डॉ.मनोज घुगे , डॉ.श्रीकांत पाठक, लोकअभिरक्षक कार्यालयाचे मुख्य अधिकारी अँड अनिल सरोदे, अँड.विक्रम वाडेकर, अँड. श्रीमती पठारे, अँड. श्रीमती रत्ना दळवी, अँड. श्री. देठे , अँड.श्री. बागुल , जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा