ब्युरो टीम : आयपीएल २०२३ मध्ये आरसीबी संघ विजयी मार्गावर परतला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बंगळुरूने पंजाब किंग्जचा त्यांच्या घरच्या मैदानावर २४ धावांनी पराभव केला. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ १५० धावांवर गारद झाला आणि सामना गमावला. आरसीबीचा या स्पर्धेतील हा तिसरा विजय आहे. आता पंजाब आणि आरसीबी या दोन्ही संघांचे सहा सामन्यांनंतर सहा गुण झाले आहेत. गुणतक्त्यामध्ये आरसीबी पाचव्या तर पंजाब सातव्या स्थानावर आहे.
या सामन्यात आरसीबीकडून विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिसने अर्धशतके झळकावली. त्याचवेळी, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा यांनी पंजाबकडून चांगली खेळी खेळली, पण दोघांचेही अर्धशतक हुकले आणि आपल्या संघाला सामना जिंकून देऊ शकले नाहीत. आरसीबीकडून सिराजने चार विकेट घेतल्या आणि तो सामनावीर ठरला.
आरसीबीचा नियमित कर्णधार फाफ डुप्लेसिस या सामन्यात पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने संघाची कमान कोहलीच्या हाती होती. मात्र, प्लेसिस फलंदाजीला आला आणि कोहलीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर कोहलीनेही ४० चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९७ चेंडूत १३७ धावांची भागीदारी केली. ४७ चेंडूत ५९ धावा करून कोहली बाद झाला. पुढच्याच चेंडूवर मॅक्सवेलही बाद झाला. कार्तिक, लोमरोर आणि शाहबाजही काही विशेष करू शकले नाहीत. प्लेसिस ५६ चेंडूत ८४ धावा करून बाद झाला आणि आरसीबीने ४ बाद १७४ धावा केल्या.
पहिल्या विकेटसाठी कोहली-प्लेसिस यांच्यातील शतकी भागीदारीनंतर आरसीबीला २०० धावा करणे अवघड नव्हते. मात्र, अर्शदीप सिंग आणि सॅम करन यांनी शेवटच्या षटकांमध्ये शानदार गोलंदाजी केली. हरप्रीत ब्रारनेही दोन बळी घेतले. शेवटच्या चार षटकात आरसीबीच्या चारही विकेट पडल्या आणि केवळ ३७ धावा करता आल्या. अर्शदीप सिंग आणि नॅथन एलिस यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
१७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या चेंडूवरच अर्थव तायडे सिराजचा बळी ठरला. हसरंगाने डावाच्या तिसऱ्या षटकात मॅथ्यू शॉर्टलाही बाद केले. लिव्हिंगस्टोन दोन धावा करून सिराजचा दुसरा बळी ठरला. २७ धावांवर पंजाबच्या तीन विकेट पडल्या. मात्र, प्रभसिमरन सिंगला साथ मिळाली नाही. हरप्रीत भाटिया १३ आणि सॅम करन १० धावा करून धावबाद झाला. पंजाबचा निम्मा संघ ७६ धावांवर तंबूमध्ये परतला होता.
यानंतर प्रभसिमरन आणि जितेश शर्मा यांनी २१ धावा जोडल्या, मात्र ३० चेंडूत ४६ धावा करून प्रभसिमरन सिंगही बाद झाला. यानंतर पंजाबच्या विकेट्स ठराविक अंतराने पडत राहिल्या. शाहरुख खान सात धावांवर, हरप्रीत ब्रार १३ धावांवर आणि नॅथन एलिस एका धावेवर बाद झाला. मात्र, जितेश शर्माने सुरेख खेळी केली. १७ षटकांनंतर पंजाबची धावसंख्या सात गड्यांच्या मोबदल्यात १४५ अशी होती आणि त्यांना विजयासाठी तीन षटकांत ३० धावांची गरज होती.
सिराजने १८ व्या षटकात सामना फिरवला. या षटकात त्याने केवळ चार धावा दिल्या आणि दोन बळी घेतले. सिराजने हरप्रीत ब्रार आणि नॅथन एलिस यांना बाद करत सामना बेंगळुरूच्या बाजूने वळवला. पुढच्याच षटकात जितेश शर्माही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला आणि पंजाबचा संघ २४ धावांनी सामना गमावला.
जितेश शर्मा २७ चेंडूत ४१ धावा करून बाद झाला. आरसीबीकडून सिराजने चार विकेट घेतल्या. हसरंगाने दोन गडी बाद केले. पारनेल आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
टिप्पणी पोस्ट करा