mahatma fule: क्रांतीनायक महात्मा ज्योतिबा फुले



महेंद्र मिसाळ(श्रीगोंदा):  भारताच्या इतिहासात अनेक राष्ट्रपुरूष, समाजसुधारक, क्रांतीकारक, संत या भूमीत जन्माला आले. ज्यांनी दीन, दुबळे,पिडितांसाठी आपले आयुष्य खर्ची केले. महाराष्ट्रामधे असाच एक क्रांती सूर्य जन्माला आला.ज्यांनी अन्यायी रुढी, परंपरे विरोधात व जातीभेद निर्मुलनासाठी दंड थोपटून बंड केले. ज्यांनी समाजाचा रोष पत्करून दीन, पददलित, पीडीतासाठी कायम लढा दिला. ज्यांच्या लढ्याने समाजात समतेची पहाट उगवली. अशा या थोर महापुरुषाचे नाव होते महात्मा फुले. आज ११ एप्रिल महात्मा फुले यांची जयंती आहे त्यानिमित्त त्यांच्या कार्यास उजाळा. ज्योतीबा ते महात्मा प्रवास सोपा नव्हता. बालपणापासुन ज्योतिबांना अनेक संकटाना तोंड दयावे लागले. नऊ महिन्यांचे असताना त्यांची आईंचे निधन झाले. आई विना वाढलेले हे पोर भविष्यात पीडितांचे माय-बाप बनून समाजात क्रांती घडवेल असे कोणालाही स्वप्नातही वाटले नव्हते. जोतिबांच् लग्न बालवयात सवित्रीशी झाले. ज्योतीबा शाळेत हुशार होते. त्यांना वाचनाची आवड होती. त्यांनी पत्नीला घरीच शिक्षण दिले.ज्या काळात स्री जन्माला येणे हे पाप समजले जात होते. स्रीयांना कसलेच हक्क अधिकार नव्हते. चूल आणि मूल एवढ्यापुरतीच स्री मर्यादित होती. या काळात, समाजात जातीभेद, धर्मभेद, अंधश्रद्धा, रुढी परंपरा अस्तित्वात होत्या. देवाच्या नावाखाली भोंदू महाराज लोकांना फसवत होते. कर्मकांड वाढले होते. समाजात अंधकार पसरला होता. महिलांवर बालविवाह, सती, केशवपण, अशा अनेक अन्यायी रुढी परंपरा लादल्या होत्या.विधवांची कठीण परिस्थिती या काळात होती. मित्रांच्या लग्नाच्या वरातीत कनिष्ठ जातीचे म्हणून जोतिबांचा अपमान केला होता. ज्योतीबानी जातीभेद नष्ट करण्याचे मनाशी पक्के ठरवले. शिक्षणाचे महत्त्व ओळखून ज्योतीबानी सवित्रीला शिकवले. ज्योतीबानीं भिडेवाडा येथे पहिली मुलीची शाळा सुरू केली. सवित्री या शाळेत शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून मुलींना शिकवू लागल्या.भारतातील पहिली शिक्षिका सावित्री बनल्या.शाळेत शिकवण्यास जाताना रस्त्यात लोकांनी सावित्रीला दगड, शेण मारले. पण त्या ध्येयापासून मागे हटल्या नाहीत. समाजाचा विरोध म्हणून ज्योतिबाना व सवित्रीला आपले स्वतःचे घर सोडावे लागले. त्यांना उस्मान शेख यांनी आसरा दिला. पुढे ज्योतिषांनी अनेक शाळा सुरु केल्या व यात सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असे . स्त्रीयावरील जाचक रूढी परंपरा विरोधात हे दोघे लढा देत होते. बालविवाहाला विरोध केला. केशवपन प्रथा बंद करण्यासाठी न्हावी समाजाचा संप घडवून आणला. विधवाविवाहाला पाठींबा देवुन विधवा पुनर्विवाह घडवुन आणले. दुष्काळात दलितांना पाणी देण्यासाठी स्वतःच्या घरचा हौद खुला केला. छ. शिवाजी महाराजांवर पोवाडा रचला. ज्योतिबांनी गुलामगिरी, शेतक-यांचा आसूड, असे ग्रंथ लिहून समाजाचे वास्तव वर्णन केले.ज्योतीबाची हत्या करण्यासाठी आलेल्या दोघा आरोपींना त्यांनी माफ केले.

ज्योतिबा हे काही काळ पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. हंटर आयोगासमोर प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे व मोफत दयावे हे त्यांनी ठणकावून संगितले .सत्यशोधक समाजाची स्थापना करून पुरोहितशिवाय अनेक विवाह त्यांनी लावले. मुंबईतील कोळीवाडा येथील समाजाने त्यांना महात्मा हि पदवी रावसाहेब वडेकर यांच्या हस्ते बहाल केली. या महात्म्याने सतत समाजाच्या कल्याण व्हावे यासाठी व समतेसाठी लढा दिला. ज्योतीबा व सवित्री यांनी गुलामगिरीतून सर्वसामान्यांना मुक्त करून समतेची चळवळ यशस्वी केली. स्मी मुक्ती चळवळीचे व सामाजिक क्रांतीचे खरे जनक हे महात्मा फुले आहेत.

( लेखक- महेंद्र मिसाळ(श्रीगोंदा): हे इतिहास अभासक आहेत.)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने