Mula Mutha River : नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले...



ब्युरो टीम : पुणे शहरात सुरू असलेल्या मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामाची पाहणी आज, सोमवारी (३ एप्रिल) पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी नदीच्या दोन्ही बाजूस स्थानिक प्रजातीची झाडे लावण्यात यावी, नदी किनाऱ्यावर नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात फिरण्याचा आनंद मिळेल अशा पद्धतीने कामे करण्यात यावी,  अशा सूचना दिल्या आहेत. 

पुणे महानगरपालिकेने मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामाला सध्या वेग आला आहे. संगमवाडी ब्रिज ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा अशा दोन टप्प्यातील कामांना सुरुवात सुद्धा झाली आहे. त्यातच आज चंद्रकांत पाटील यांनी बंडगार्डन येथे जात नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सांडपाणी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता जगदीश खानोरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम एकूण ११ भागात टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यापैकी संगमवाडी ते बंडगार्डन पूल आणि बंडगार्डन पूल ते मुंढवा या कामासाठी मार्च २०२२ मध्ये आदेश देण्यात आले असून ही कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामाचा प्रथमत: ३०० मीटरचा भाग पूर्ण करण्यात येत आहे.’

जायका प्रकल्पाची केली पाहणी

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेतर्फे जायका प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या डॉ. नायडू मैलापाणी शुद्धीकरण केंद्राच्या कामास देखील भेट देऊन पाहणी केली. या प्रकल्पाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावे व सांडपाणी शुद्धीकरणासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. प्रक्रीया केलेल्या पाण्याच्या पुनरुपयोगाबाबत आतापासून नियोजन करावे, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.



दरम्यान, या प्रकल्पाची क्षमता १२७ दशलक्ष लिटर प्रतिदिन असून प्रकल्पाच्या माध्यमातून वर्षाला ४ कोटी रुपयांची वीज निर्माण होणार आहे. ही वीज महापालिका उपयोगात आणणार असल्याने वीज खर्चात बचत होणार आहे. शहरात विविध ठिकाणी असे प्रकल्प उभारण्यात येत असून २०२५ अखेरपर्यंत नदीत प्रक्रीया केलेले पाणीच सोडण्यात येईल. प्रकल्पातून तयार होणाऱ्या पाण्याचा उद्योगासाठीदेखील वापर करता येईल,  अशी माहितीही देण्यात आली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने