Ahmednagar: काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाने आमदार नितेश राणेंना दिले 'हे' आव्हान



 विक्रम बनकर, नगर: व्यापाऱ्यांच्या आडून राजकीय नेते पोळ्या भाजत आहेत. यापूर्वी स्व. बार्शीकरांनी बाजारपेठेतल्या रस्ता रुंदीकरणाचा प्रयत्न केला होता. मात्र आता काही बलाढ्य राजकीय नेत्यांच्या राजकीय, आर्थिक स्वार्थासाठी बाजारपेठ उध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरू आहे. आधी हॉकर्सना, नंतर व्यापाऱ्यांच्या दुकानांना रुंदीकरणाच्या नावाखाली जेसीबी लावण्याचा डाव आहे. भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांना ना व्यापाऱ्यांची काळजी आहे ना हॉकर्सची, असा घाणाघात शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात मृत्युमुखी पडलेल्यांना पत्रकार परिषदेपूर्वी श्रद्धांजली वाहण्यात आली. सरकारवर टीका करण्यात आली. बाजारपेठेतील घडामोडींवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना काळेंनी अनेक गौप्यस्फोट करीत गंभीर आरोप केले. यावेळी मनोज गुंदेचा, मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, दशरथ शिंदे, प्रवीण गीते, अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, राहुल सावंत, गौरव घोरपडे आदी उपस्थित होते. काळे म्हणाले, नवलानींवरील हल्ल्याचा काँग्रेस तीव्र निषेध करते. हल्लेखोराला कठोर शिक्षा झाली पाहिजे. फरार आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. पोलिसांचा धाक उरलेला नाही. वर्षभरापूर्वी अतिक्रमण विरोधी कारवाई करुन तात्पुरती मलमपट्टी करत व्यापाऱ्यांची फसवणूक करण्यात आली होती. त्यांनी मोठी गुंतवणूक करून दुकानं घेतली आहेत. त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी मनपावर आहे.

मात्र गोरगरीब, हातावर पोट भरणाऱ्यांचं फेरीवाला धोरणाप्रमाणे जोपर्यंत कायमस्वरूपी योग्य पुनर्वसन मनपा करत नाही तोपर्यंत व्यापाऱ्यांची मागणी कायमस्वरूपी निकाली निघू शकत नाही. जेसीबी फिरवून गोरगरिबांच्या संसाराची राख रांगोळी करण्याचा कोणालाही अधिकार नाही. बाजारपेठेत स्वतःच एकही दुकान नसणारे तथाकथित राजकीय पुढारी ढोंगी भाषणबाजी करून एकाच वेळी व्यापारी, हॉकर्सची फसवणूक करत आपली राजकीय दुकानदारी चालवीत असल्याचा आरोप काळेंनी केला. बाजारपेठ उध्वस्त होताना पाहणे दुर्दैवी असल्याचे भावनिक मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. 

आडते बाजार, दालमंडई स्थलांतराचा डाव :

शहरात बाजार समितीची २८ एकर जागा आहे. सोयऱ्या धायऱ्यांच्या हातात सत्ता आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर ३ फेजमध्ये समिती आवारात रीडेव्हलपमेंटच्या नावाखाली २०० कोटी रूपयांचा बांधकाम आराखडा तयार करण्यात आला असून गाळ्यांच्या विक्रीतून मलिदा लाटण्यासाठी आटापिटा सुरू आहे. कोरोना काळात भाजी व फळबाजार नेप्ती उपबाजाराला स्थलांतरित करण्याचा डाव व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे फसला. भविष्यात दहशतीच्या जोरावर तो स्थलांतरीत केला जाणार असून तिथे आडते बाजार, दालमंडई स्थलांतरित करण्याचा डाव असल्याचा मोठा गौप्यस्पोट यावेळी काळेंनी केला. यासाठी हळूहळू बाजारपेठेतील वातावरण खराब केले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

'यासाठी' व्यापारी, फेरीवाल्यांच्या प्रश्नाला धार्मिक रंग :

मर्जीतल्या बिल्डरांना हाताशी धरून पाईपलाईन रोड, झोपडी कॅन्टीन जवळ व्यावसायिक गाळे, मॉलचे काम सुरू आहे. मनमाड रोडवर एका संस्थेचा मोठा भूखंड लाटून ३०० कोटींचा मॉल उभा करण्याचा डाव असल्याचा दुसरा गौप्यस्पोट काळे यांनी केला. बाजारपेठ उध्वस्त केल्याशिवाय पुढारी, बिल्डर लॉबीच्या संगमतातून उभे राहणारे हे मॉल चालणार नाहीत. ग्राहक मिळणार नाही. यामुळेच बाजारपेठेतील विषयाला धार्मिक रंग देण्याचे षडयंत्र आहे. मॉल संस्कृतीमुळे बाजारपेठ, उपनगरांतील छोटे व्यापारी कायमचे उध्वस्त होतील, अशी भीती काळेंनी यावेळी व्यक्त केली.

राणेंवरवर काँग्रेसने साधला निशाणा, काळेंनी केला फोटो ट्विट :

भाजप नेते आ. नितेश राणे शहरात येत आहेत. यावर टिप्पणी करताना किरण काळे म्हणाले, राणे हिंदूंसाठी येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी येताना शहरातील आमच्या पन्नास हजार हिंदू तरुण बांधवांच्या रोजगारासाठी सरकारकडून एमआयडीसी करिता दहा हजार कोटींचे पॅकेज आणावे. टाटा, बिर्ला, महिंद्रा, बजाज या सारखे मोठ मोठे उद्योग घेऊन यावेत. यामुळे बाजारपेठेतील व्यापाराला देखील चालना मिळेल, असे म्हणत काँग्रेसने राणेंना सभेपूर्वी डीवचले. नवलानींसह हिंदू बांधव असणारे माळी समाजाचे कांदा व्यापारी चिपाडेंना राणेंनी न्याय मिळवून द्यावा. काळेंनी राणेंना टॅग करत व्यापारी हल्ला प्रकरणातील ३०७ चा गुन्हा दाखल असणाऱ्या हल्लेखोराचा आणि राष्ट्रवादीच्या शहराच्या आजी, माजी आमदारांचा ट्विटरवर फोटो ट्विट केला आहे. त्यात म्हटले आहे की, उपाध्ये नामक हल्लेखोर हा आमदारांचा कार्यकर्ता असून आयुर्वेद महाविद्यालयात लपून बसला आहे. राणेंना हा अड्डा माहित नसेल तर त्यांच्याच पक्षाचे खासदार हे आमदारांचे घनिष्ठ राजकीय मित्र आहेत. ते त्यांना अड्डा दाखवतील. राणेंनी हिंमत असेल तर बाजारपेठेत जाण्यापूर्वी त्यांच्या सरकारच्या माध्यमातून  आरोपीला अटक करुन दाखवावी, अस जाहीर आव्हान काँग्रेसने दिले. नगर हे आमचं घर आहे. गरळ ओकून त्यात बाहेरच्यांनी वातावरण खराब करू नये, असे म्हणत काँग्रेसने राणेंवर यावेळी जोरदार निशाणा साधला. सध्या राज्यात, देशात डबल इंजिन हिंदुत्ववादी सरकार असतानाही हिंदू असुरक्षित कसे ? हे पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्र्यांचे अपयश आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदूंसह सर्व धर्मीय सुरक्षित होते, असा दावा काळेंनी केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने