ब्युरो टीम: महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय
निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादीसह 'तृणमूल कॉँग्रेस' आणि 'कम्युनिस्ट
पार्टी ऑफ इंडिया' यांचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात
आला आहे.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा
मिळविण्यासाठी देशातील किमान चार राज्यांमध्ये एखाद्या पक्षाच्या उमेदवारांना 6
टक्क्यांहून अधिक मते मिळणे आवश्यक आहे. तसेच लोकसभेत किमान 4 खासदारांनी त्या
पक्षाचे प्रतिनिधित्व केले पाहिजे, असा नियम आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने
राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी (एनसीपी),
तृणमूल कॉँग्रेस (टीएमसी), कम्युनिस्ट
पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) या तिन्ही पक्षांच्या कामगिरीचा आढावा अलिकडेच घेतला
होता. त्यानुसार हे तिन्ही पक्ष राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी आवश्यक निकषांची
पूर्तता करत नसल्याने त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याची कारवाई
निवडणूक आयोगाने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला
10 जानेवारी 2000 रोजी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. 2014 च्या लोकसभा
निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा कायम होता. मात्र, अलिकडच्या काळात
महाराष्ट्राबाहेर अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि
नागालँड या राज्यात राष्ट्रवादीची कामगिरी सुमार राहिली आहे. यामुळे केंद्रीय
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉँग्रेसला नोटीस बजावली होती.
टिप्पणी पोस्ट करा