Niteshrane: पोटासाठी रोजगार द्या... नितेश राणे भगाव.. नगर बचाव...म्हणत हिंदू युवकांची बाजारपेठेत निदर्शने,



विक्रम बनकर, नगर : मंगळवारी भाजप नेते आ. नितेश राणेंनी बाजारपेठेत चौकसभेत अनेक आरोप केले. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी राणेंना आमच्या पन्नास हजार हिंदू तरुण बांधवांसाठी रोजगार देत दहा हजार कोटींचे एमआयडीसी, बाजारपेठेसाठी पॅकेज आणण्याचे आवाहन केले होते. राणेंनी याबाबत ब्र सुद्धा न काढल्याने युवक काँग्रेसमधील संतापलेल्या हिंदू युवकांनी बाजारपेठेत रस्त्यावर उतरत 'नितेश राणे भगाव, नगर बचावचा' नारा देऊन निदर्शने केली आहेत. नवी पेठ चौकात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.

प्रवीण गीते म्हणाले की, राणेंना आम्हा हिंदू तरुणांच्या हातामध्ये एकमेकांची माथी फोडण्यासाठी दगडं द्यायची आहेत. हिंदू असल्याचा आम्हाला अभिमान आहे. राणे ढोंगी हिंदुत्ववादी नाहीत हे त्यांनी सिद्ध करावे. ते शहरात हिंदुत्वासाठी तसेच आमच्या हिंदू व्यापारी बांधवांसाठी आले नव्हते तर भाजपच्या २०१४ च्या निवडणुक प्रचारासाठी आले होते. हिंदू व्यापाऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर त्यांच्यावर हल्ले करणाऱ्यांना अटक करा. माञ व्यापारी चिपाडे, नवलानींवरील काही हल्लेखोर राणेंच्या दौऱ्यानंतरही फरार आहेत.

राणे आणि शहराच्या स्थानिक आमदारांतील आरोप प्रत्यारोप पाहिले तर गल्लीतल्या लहान पोरांची भांडणे यापेक्षा बरी असतात असे वाटले. जनतेचे लोकप्रतिनिधी जर एवढा पोरकटपणा करत असतील तर आम्ही युवकांनी यांचा काय आदर्श घ्यायचा ?. शहराला प्रगल्भ विचारांच्या, विकासाचे व्हिजन असणाऱ्या, प्रश्नांची सोडवणूक करण्याची क्षमता असणाऱ्या, सुसंस्कृत, उच्चशिक्षित नेतृत्वाची गरज असल्याचे यावेळी हिंदू युवक आकाश आल्हाट म्हणाले.

हिंदू युवकांचे राणेंना सात जाहीर प्रश्न :

हिंदू युवकांनी राणेंना सात जाहीर प्रश्न विचारले आहेत. नगरमध्ये यायचं असेल तर या प्रश्नांची उत्तरे द्या. अन्यथा हिंदू युवकांचे भवितव्य खराब करण्यासाठी शहरात पाय ठेवू नये,असा इशारा दिला आहे. प्रश्न : १) तुमच्या भडकाऊ भाषणांमुळे गुन्हे दाखल झाल्याने नोकऱ्या मिळत नाहीत. हिंदू युवकांसाठी कायदा बदलून आरोपी असतानाही नोकऱ्याचा विशेष जीआर सरकार कधी काढणार आहे ?, २) गुन्ह्यांमुळे प्रतिमा मलिन झाल्यामुळे लग्नाला कुठल्या ही बाप पोरगी देत नाही. सरकार आमची लग्न जमवण्याची जबाबदारी घेणार आहे की नाही ?, ३) अन्य धर्मीय उद्योजक, व्यापाऱ्यांकडे काम करून कुटुंब पोसणाऱ्या आमच्या कष्टकरी हिंदू बापांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विशेष पॅकेज कधी जाहीर करणार आहे ?.

४) तुम्ही धार्मिक रंग दिल्यामुळे दोन व्यापाऱ्यांमधील सुरु झालेले वैयक्तिक भांडण संपूर्ण बाजारपेठेसह आमच्या सर्व हिंदू व्यापाऱ्यांना उध्वस्त करण्यावर येऊन ठेपले आहे. यात आमच्या अन्य हिंदु व्यापाऱ्यांचा, दुकानांमध्ये काम करणाऱ्या हिंदू गोरगरीब कामगारांचा दोष काय ?, ५) व्यापाऱ्यांशी असणाऱ्या सलोख्याच्या संबंधातून आमचे हिंदू बांधव, माता, भगिनी हातगाडीवाले, फेरीवाले पोटाची खळगी भरतात. अन्य धर्मीयांना जेसीबी लावताना हिंदूं फेरीवाल्यांवर ही तूम्ही, खासदारांनी, आमदारांनी प्रशासनाला आदेश देऊन कारवाई केली. आम्ही हिंदू असूनही तुम्ही संसाराची राख रांगोळी का केली ? हिंदूंसाठी तरी फेरीवाला धोरण अंमलबजावणी करणार आहात की नाही ? ६) हिंदूंसाठी पेट्रोल, डिझेल पन्नास रुपये लिटर कधी करणार आहात ? ७) हिंदूंसाठी गॅस तीनशे रुपये कधी करणार आहात ?

यावेळी गीते, अल्हाट यांच्यासह विकास भिंगारदिवे, योगेश जाध,व विकास साळवे, शंकर आव्हाड, प्रणव मकासरे, गौरव घोरपडे, सुजित क्षेत्रे, मयूर भिंगारदिवे, अक्षय गायकवाड आदींसह तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हिंदू युवकांच्या या चक्रावून टाकणाऱ्या प्रश्नांमुळे बाजारपेठेसह शहरात खळबळ उडाली आहे. हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या आमच्या तमाम हिंदू तरुण बांधवांनी देखील हे प्रश्न राणेंना विचारावेत असे आवाहन यावेळी युवकांनी केले आहे.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने