Pune university ::पुणे विद्यापीठात सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर; मुख्य इमारत आवारात अश्‍लिल गाण्याचे चित्रीकरण !

 


ब्युरो टीम:-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवारात अश्‍लिल गाण्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आल्याचा धक्‍कादायक प्रकार निदर्शनास आला आहे.

यामुळे विद्यापीठाची बदनामी होत असून, विद्यापीठाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल विद्यापीठ प्रशासनाने घेतली असून, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवाराबरोबरच चक्‍क हॉलमध्येही चित्रीकरण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. चित्रित करण्यात आलेल्या रॅपमध्ये तलवार, पिस्तुल आणि दारूची बाटली दिसत आहे. मुख्य आवारात या सर्व वस्तू फिरतानाचे चित्रीकरण करण्यात आले असून, यात अश्‍लिल व आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत चित्रीकरण कसे काय होऊ शकले, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे. या सर्व प्रकारची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस आकाश झांबरे विद्यापीठ विद्यार्थी कृती बचाव समितीचे सदस्य राहुल ससाणे यांनी कुलगुरूंकडे केली आहे. सोशल मीडियावरून रॅप व्हायरल झाल्याने हा सर्व प्रकार निदर्शनास आला आहे.

 

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत व आवारात विद्यापीठाची परवानगी न घेता व्हिडिओ चित्रीकरण करणे ही बाब आक्षेपार्ह व गंभीर स्वरूपाची आहे. विद्यापीठ अशा कृत्याचा तीव्र निषेध करीत आहे. याबाबत चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

-डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने