ब्युरो टीम: भारतीय हवामान खात्याने अहमदनगर जिल्हयात 14 एप्रिलपर्यंत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा तसेच मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेत दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.
मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉंन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या केबल्स् पासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर या मालाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.
आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्षातील, दुरध्वनी क्र.1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासमार्फत करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा