Ram Shinde : भाजप नेते राम शिंदेंनी टाकला राजकीय बॉम्ब, लोकसभा निवडणूक लढण्याचे दिले संकेत

 


विक्रम बनकर, नगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील आगामी निवडणूक रंगतदार होणार, अशी चर्चा आतापासूनच आहे. सध्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांनी या आज एक राजकीय बॉम्ब टाकला आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक असून पुढील वर्षभर त्याची जोरदार तयारी करणार असल्याची घोषणा प्रा. शिंदे यांनी आज अहमदनगरमध्ये केली.

शिंदे यांनी आज अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले,‘भाजपने मला पूर्वी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यास संगितले होते. त्यासाठी तयारीही केली होती. मात्र, नंतर पक्षाचा निर्णय बदलला आणि ते राहून गेला. नंतर मला विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. त्यामध्ये मी निवडूनही आलो. २०१४ मध्ये मी आमदार असताना माझी नसली तरी कार्यकर्त्यांची इच्छा होती की, मी लोकसभेची निवडणूक लढवावी. आमदार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून मीही त्यासाठी तयार झालो होतो. त्यावेळी मी, प्रताप ढाकणे आणि दिलीप गांधी असे तिघे इच्छूक होतो. यात गांधी यांना उमेदवारी मिळाली. पक्षाचा निर्णय मान्य करून त्यांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी मी नगरचा पालकमंत्री होतो. तेव्हाही आमच्या पक्षातीलच नव्हे तर विरोधीपक्षातील काही मंडळीही मला लोकसभा निवडणूक लढविण्यास संगत होते. तेव्हा मी ते गांभीर्याने घेतले नाही. पुढे डॉ. सुजय विखे पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझ्यावर सोपविण्यात आली होती. मी ती यशस्वीरित्या पार पाडली. सलग दुसऱ्यांदा माझ्याकडून लोकसभा निवडणूक लढविण्याचे राहून गेले. मात्र आता २०२४ च्या निवडणुकीत मी विधानसभेची निवडणूक तर लढणार आहेच. मात्र आता लोकसभा निवडणूक लढविण्यासाठीही मनाची तयारी ठेवली आहे. जर आता तशी राजकीय परिस्थिती आलीच तर लोकसभा निवडणूकही लढवायची असे मी ठरविले आहे. पक्षाचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे यावेळी मी लोकसभा निवडणूक लढविण्यासही तयार आहे,’ असेही शिंदे म्हणाले.

पहा व्हिडिओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने