Rohit Pawar : रोहित पवारांना विद्यार्थ्यांनीचं पत्र, म्हणाली 'प्रिय रोहित दादा...'



ब्युरो टीम : आठवीतील एका विद्यार्थींनीने आमदार रोहित पवार यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. अर्थात त्यामागे कारणही तेवढेच खास आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना सुमारे दहा हजार सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शाळेची चांगली सोय झाली आहे.  याबद्दलच हे पत्र असून सध्या ते वेगाने व्हायरल होत आहे.

कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथील तृप्ती थिटे या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने  आमदार पवार यांना आभाराचे पत्र लिहिले आहे. एवढेच नव्हे तर एक मोठी मागणीही केली आहे. पवार यांनी हे सोशल मीडियात शेअर करून या विद्यार्थ्यानीचे आभार मानले आहेत.

तृप्ती हिने पत्रात म्हटले आहे की, 'तुम्ही सायकली दिल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. तुम्ही आमच्या भविष्यासाठी एक दूत आहात, याची खात्री पटली आहे. कर्जत-जामखेडच्या विकासासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात. आमची स्वप्न तुम्ही पूर्ण करताना दिसत आहात. आता कर्जतमध्ये एक भव्य मेडीकल कॉलेज उभे राहावे, अशी आमची इच्छा आहे. आमची ही इच्छा तुम्ही पूर्ण कराल, याची खात्री आहे. तुम्ही आमच्या भागासाठी काम करीत आहात, याचा आम्हा लहान मुलांनाही खूप आनंद वाटत आहे.'

आमदार पवार यांनी यावर म्हटले आहे की, तृप्तीसारख्या हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवणं यांच्यासारखं दुसरं समाधान नाही. हे आनंदाचे आणि समाधानाचे क्षण अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल खरं म्हणणे मीच या मुलांचे आभार मानायला हवेत, असेही पवार यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने