sachin paylat: स्वपक्षीय सरकारविरोधात उपोषण; सचिन पायलट पुन्हा बंडाच्या तयारीत?



ब्युरो टीम: काँग्रेस नेते सचिन पायलट हे पुन्हा बंडाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. पायलट हे एक दिवसांच्या उपोषणावर बसले आहेत. मंगळवारी त्यांनी जयपूरमधील शहीद स्मारक इथे आपले उपोषण सुरू केले आहे. पायलट यांनी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांच्या काळात झालेल्या घोटाळ्याची चौकशी केली जावी यासाठी हे उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण त्यांनी राजस्थानातील अशोक गेहलोत यांच्या सरकारविरोधात सुरू केले आहे.

भाजपच्या वसुंधरा राजे या राजस्थानच्या मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात जे घोटाळे झाले होते त्यांची चौकशी करण्याची मागणी पायलट करत आहेत. गेहलोत यांचे काही जुने व्हिडीओ दाखवत पायलट यांनी त्या घोटाळ्यांची चौकशी का केली जात नाहीये असा प्रश्न विचारला आहे. काँग्रेसकडे भाजपच्या सरकारने केलेल्या घोटाळ्यांचे पुरावे होते, मात्र तरीही कारवाई करण्यात आली नाही असे पायलट यांचे म्हणणे आहे.

काँग्रेस पक्षाने पायलट यांना उपोषण करू नये असा इशारा दिला होता, तरीही पायलट यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. पक्षाने दिलेला इशारा नजरेआड केल्यास ती कृती पक्षविरोधी मानली जाईल असा इशारा काँग्रेसने दिला होता, तरीही पायलट आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. काँग्रेस प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा यांनी म्हटले आहे की, काँग्रेस भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहे. यामुळे पायलट यांनी आमच्याशी आधी बोलणं गरजेचं होतं. आम्ही त्यांचे म्हणणे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कानावर घातली असती, त्यानंतरही जर कारवाई झाली नसती तर पायलट यांना उपोषण करण्याचा अधिकार होता. असं करण्याऐवजी त्यांनी थेट उपोषणाला बसणे हे योग्य नाही.

सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील संघर्ष काही नवा नाही, जो आतापर्यंत अनेकदा जगजाहीर झालेला आहे. 2018 च्या निवडणुकीपासून या संघर्षाला नवे धुमारे फुटले होते. नोव्हेंबर 2018 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी पायलट हे प्रदेशाध्यक्ष होते. निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष सगळ्यात मोठा पक्ष बनला होता. यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी गेहलोत आणि पायलट यांच्यात रस्सीखेच सुरू झाली होती. पक्षश्रेष्ठींनी या संघर्षात गेहलोत यांची बाजू घेत त्यांना मुख्यमंत्री पद दिलं होतं. तेव्हापासून पायलट हे नाराज आहेत. जुलै 2020 मध्ये पायलट यांनी काही आमदारांसह मिळून बंड केलं होतं. यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून आणि उपमुख्यमंत्री पदावरून हटविण्यात आलं होतं. प्रियंका गांधींनी यामध्ये हस्तक्षेप केल्याने सचिन पायलट यांचे मन परिवर्तन झाले होते

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने