ब्युरो टीम :शिर्डी विमानतळावर शनिवारी, ८ एप्रिल रोजी रात्री ८.१० वाजता दिल्लीहून निघालेले इंडिगोचे एअरलाईन्सचे पहिले प्रवासी विमान २११ प्रवासी घेऊन दाखल झाले. मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या नाईट लॅडिंग सुविधेची आज खऱ्या अर्थान चाचणी यशस्वी झाली. रात्री ९ वाजता २३१ प्रवाश्यांना घेऊन हेच विमान दिल्लीकडे प्रयाण झाले. या विमानसेवा नाईट लँडींग सुविधा सुरू झाल्याने शिर्डी विमानतळाच्या विकासाला आणि परिसराच्या अर्थकारणाला मोठी गती येणार आहे.
साईबाबा दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांमध्ये आनंद व उत्साह दिसून आला. शिर्डी विमानतळाचे संचालक सुशील श्रीवास्तव यांनी केक कापून या प्रवाश्यांचे स्वागत केले. विमानतळ अधिकारी- कर्मचाऱ्यांनी प्रवाश्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
रात्रीच्या या विमानसेवेचा प्रवाश्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. या विमानसेवेमुळे देशपातळीवरील प्रवाशांना एकाच दिवसात दर्शन घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे भाविकांचा वेळ व श्रम ही वाचणार आहे. पर्यायाने स्थानिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. अशी प्रतिक्रिया अनिकेत काळे, शालिनी सचदेवा, मिर्नाली दास या प्रवाशांनी दिल्या.
नाईट लॅडींग सेवा सुरू होण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. यामुळे फेब्रुवारी महिन्यात शिर्डी विमानतळास नागरी उड्डयन महानिदेशालयाने (डीजीसीए) नाईट लँडींगला परवाना दिला व रात्रीची विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
मार्च महिन्यात या विमानतळाच्या प्रवाशी टर्मीनल इमारतीसाठी तब्बल ५२७ कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत. त्याचबरोबर ‘नाईट लँडींग’ ची सुविधा सुरू होणे शिर्डी व परिसराच्या प्रगतीचे नवे दालन खुले करणारे ठरणार आहे.
तूर्तास,आजचे नाईट लॅडिंग चाचणी यशस्वी झाली असून पंधरा-वीस दिवसांत नियमित सेवा सुरू होणार आहे. २३२ प्रवासी क्षमता असलेले हे विमानात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांचा शंभर टक्के प्रतिसाद लाभला.
टिप्पणी पोस्ट करा