ब्युरो टीम: कट्टर राजकीय वैर असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार दिलीप मोहिते पाटील हे एका विवाह समारंभाच्या निमित्ताने एकत्र येत मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले.त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आढळराव पाटील लोकसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा होत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांची वाढलेली सलगी लक्ष वेधून घेत आहे.
वर्षभरावर लोकसभा निवडणूक
आली आहे. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे पाहता शिरूरमधून कोण निवडणूक लढविणार, याचे आडाखे
बांधले जात आहेत. विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा मतदारसंघात फारसा संपर्क
नाही. त्यांच्यावर राष्ट्रवादीमधील काहीजण नाराज आहेत, अशी चर्चा आहे.
अशातच कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. कोल्हे यांनी त्याला
दुजोरा दिला नसला तरी भाजपचे नेते त्याबाबत वक्तव्य करून सस्पेन्स निर्माण करत
आहेत. दुसरीकडे शिंदे गटात सामील झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी
लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मागील पराभवाचे उट्टे त्यांना
काढायचे आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी आणून
विकासकामे मार्गी लावली आहेत. आढळराव पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास
सुरुवात केली आहे. असे असताना भाजपने शिरूर लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत
केले आहे.
आढळरावांचा 'प्लॅन बी'?
केंद्रीय मंत्र्यांचे
दौरे झाले आहेत. शिरूरची जागा भाजप स्वतः लढणार की शिंदे गटाला सोडणार, याबाबत सस्पेन्स
कायम आहे. दुसरीकडे आढळराव पाटील यांनी प्लॅन बी तयार ठेवल्याचे म्हटले जाते.
यदाकदाचित शिवसेना-भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते राष्ट्रवादीचे
उमेदवार असू शकतात, अशीही चर्चा सुरू आहे. कोल्हे यांच्याबाबतची
नाराजी पाहता, राष्ट्रवादीने दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू केला तर आढळराव
पाटील हा पर्याय असू शकतो, असे राजकीय जाणकार सांगतात. या पार्श्वभूमीवर
श्रीक्षेत्र ओझर या ठिकाणी पार पडलेल्या विवाह समारंभात आढळराव पाटील व
राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील गप्पांची रंगलेली मैफल चर्चेला वाव देऊन गेली.
टिप्पणी पोस्ट करा