Skymet Monsoon 2023 :जुलै-ऑगस्टमध्ये किती पाऊस पडणार? जाणून घ्या 'स्कायमेट'चा मान्सून अंदाज



ब्युरो टीम : भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) या महिनाअखेर सन २०२३च्या मान्सून हंगामासाठी पहिल्या टप्प्यातील अंदाज जाहीर करण्यात येईल. पण ‘स्कायमेट’ या अमेरिकेतील खासगी संस्थेने मात्र त्यांचा मान्सून अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार  राज्यासह देशात यंदा सरासरीपेक्षा कमी म्हणजे सुमारे ९४ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज ‘स्कायमेट’ या संस्थेने वर्तवला. देशात जून ते सप्टेंबर या काळात सर्वसाधारण ८६८.८ मिमीच्या तुलनेत ८१६.५ मिमी पाऊस पडण्याची शक्यताही संस्थेने व्यक्त केली.

यंदा सर्वसामान्य पावसाची केवळ २५ टक्के शक्यता आहे. दीर्घ कालावधीचा पाऊस सरासरीच्या (एलपीए) ९४ टक्के अपेक्षित आहे. अनेक भागांत दुष्काळ पडण्याची शक्यता २० टक्के आहे. ‘एल निनो’मुळे आगामी काळात मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आहे, असे ‘स्कायमेट’ने अधोरेखित केले.

‘एल निनो’मुळे देशाच्या उत्तर आणि मध्य भागातही पावसाच्या सरासरीवर परिणाम होऊ शकतो. राज्यासह गुजरात, मध्य प्रदेश येथे जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांत तुलनेने कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असे ‘स्कायमेट’ने नमूद केले आहे.

दरम्यान, आता यानंतर सर्वांच्या नजरा भारतीय हवामान खात्याच्या भाकिताकडे लागल्या आहेत.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने