डॉ. संदीप तपासे: दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या गाज्यावाज्यात, धूमधडाक्यात, उत्साहात आणि हर्षोल्साच्या वातावरणामध्ये फेब्रुवारीत छत्रपतीशिवाजी महाराज आणि एप्रिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वांनी अतिशय आनंदात साजरी केली.
जवळपास या जयंतीच्या एक महिना अगोदर चाललेला हा ‘यज्ञच’ म्हणावा लागेल आता थंडावलेला आहे परंतु सर्वांना असे का वाटत नाही की हा यज्ञ फक्त आपण एकच दिवस का साजरा करावा? छत्रपतींचे किंवा बाबासाहेबांचे आचार- विचार हा काही त्यांच्या जयंतीच्या दिवशीच मांडण्याचा विषय नाही तर प्रत्येक क्षण हे विचार अमलात आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी वेगळे प्रयत्न केले पाहिजे.
किती लोकांच्या घरी छत्रपतींचे व बाबासाहेबांचे फोटो आहेत, कितींच्या घरी संविधान प्रत आहे, ग्रंथालय आहे हे माहित नाही परंतु फक्त (मद्यपान करून) नाचून किंवा गाऊन, मिरवणुकी काढून, गुलाल उधळून, फटाके फोडून, मोठ-मोठ्या आवाजात डीजे लावून, समाज माध्यमांवर स्टेट्स ठेऊन किंवा फोटो ठेऊन, भगवे- पांढरे कपडे घालून, साड्या नेसून, फगवे-निळे फेटे बांधून, रिक्षा व घरांवर झंडे लावून त्यांना या एका दिवसापुरते अभिवादन करणे कितपत योग्य आहे.
महत्त्वाचा प्रश्न हा की या जयंतीच्या नंतर काय? हा खरा विचार छत्रपतींना व बाबासाहेबांना मानणाऱ्या सर्व समाजातील लोकांनी सुद्धा करायला पाहिजे. खरंतर भाषण देण्यासाठी जे-जे वक्ते आपण बोलवतो ते वक्ते अत्यंत जोशपूर्ण आणि अभ्यासपूर्ण माहोल निर्माण करून आपल्याला या महापुरुषांनी काय संदेश दिला हे दरवर्षी सांगतात. परंतु ते आपण आत्मसात किती करतो आणि आमलात किती आणतो हा या ठिकाणी खरा प्रश्न आहे.
प्रत्येक समाज घटकाने आप-आपल्या जातीचे महापुरुष हे वाटून घेतले आहे, असे चित्र दरवर्षी दिसते पण त्या महापुरुषांचे आचार, विचार आणि कार्य याकडे डोळस आणि अभ्यासपूर्ण लक्ष दिल्यास असे दिसून येते की यांनी आपले संपूर्ण आयुष्यच संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी खर्ची केले त्यांनी कोणत्याही विशिष्ट जाती-धर्माचा कधीच विचार केला नाही. जे वंचित, पिडीत, बहुजन आहेत त्यांना न्याय देण्यासाठी आयुष्यभर लढले.
यावर्षी आपण तर आंबेडकरी जलसा म्हणजेच आंबेडकर गीतांचा कार्यक्रम घडवून आणला. अभिनंदन. खूप छान झाला परंतु बाबासाहेबांना अपेक्षित अजूनही स्वातंत्र्य, समता, बंधुता ही देशात नव्हे तर समाजात सुद्धा निर्माण झालेली नाही. आपल्या समाजातील अनेक उच्चशिक्षित लोक जे मोठमोठ्या सरकारी, निमसरकारी, खाजगी, सहकारी संस्थांमध्ये मोठमोठ्या अधिकाराच्या पदावर आहेत परंतु त्यांच्या या अधिकाराचा, पदाचा लाभ आपल्या गावातील शिक्षित, उच्चशिक्षित. अर्धशिक्षित, अशिक्षित गरीब मुला-मुलींना, बांधवांना किती आणि कशा प्रकारे झाला हा या ठिकाणी संशोधनाचा आणि चिकित्सेचा विषय होऊ शकत नाही का? का फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या सुख-सुविधांचा, आरक्षणाचा लाभ घेऊन हे लोक उच्च पदावर गेले अर्थात त्यांच्या मेहनतीमुळे गेले यात शंका नाही परंतु त्यानंतर त्यांनी आपल्या या समाज बंधूंकडे लक्ष दिले नाही ही वस्तुस्थिती आपणा सर्वांना नाकारता येणार नाहीत.
तर आता याला उपाय काय? उपाय फक्त हाच की या लोकांना कोणी सांगू शकत नाही कारण की ते अधिकाराने, शिक्षणाने उच्च आहेत परंतु समाजाचा एक असा घटक आहे की जो या लोकांना देखील सांगू शकतो ते म्हणजे समाजातील असलेले जेष्ठ प्रतिष्ठित जुने-जाणते लोक, विद्वान, विचारवंत, लेखक, कवी, समाजसेवक, नेते या लोकांचे हे नक्की ऐकतील आणि समाजाच्या हितासाठी काहीतरी प्रयत्न करतील अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे.
आणखी काही मुद्दे या जयंतीनंतर लक्षात येताना दिसतात की आपण जयंती तर खूप मोठ्या स्वरुपात आणि उत्साहाने साजरा करतो, आपल्या सर्वांना छान प्रतिसाद मिळतो, त्यातून मोठ्या प्रमाणात वर्गणी ही मिळते. परंतु आजही खेडेगावांमध्ये एकापेक्षा जास्त जयंत्या साजरा होताना दिसतात. या गल्लीत एक तर दुसऱ्या गल्लीत दुसरी.
शहरांमध्ये ठीक आहे कारण की तेथे प्रत्येक वार्ड, नगर, प्रभाग वेगळे असते परंतु तिथेही सर्वांनी एकत्रित येऊन जयंती करायला काहीच हरकत नाही. खेड्यामध्ये मात्र एकत्रच जयंती करावी. त्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावा लागणार आहे कारण की आपण कितीही उच्चशिक्षित, ज्ञानी असलो तरी खेड्यातील जात व्यवस्था म्हणावी एवढी बदललेली नाही आहे असं म्हणायला वाव आहे. त्यानंतर महत्त्वाच्या गोष्ट म्हणजे आपण केवळ मिरवणूक काढून नाचून गाऊन आता चालणार नाही कारण आता जयंतीचे स्वरूप वेळ, काळ आणि परिस्थितीनुसार परिवर्तीत झाले पाहिजे. कारण आपला संघर्ष हा येथील उच्च वर्णीय, वर्गीय लोकांशी आहे. तो फक्त पैशाच्या, प्रतिष्ठेच्या बाबतीत नाही तर सर्व प्रकारच्या समानतेच्या बाबतीत देखील आहे. आता आपण आपल्या भावी पिढ्यांचा विचार केला पाहिजे त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे. काही विधायक काम केली पाहिजे उदा. जी वर्गणी आपण गोळा करतो त्यातून आपल्याला सार्वजनिक वाचनालय सुरू करता येईल का? शिक्षित, होतकरू मुला-मुलींसाठी सर्व सुख-सुविधांनी युक्त स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करता येईल का? ज्या अर्धशिक्षित-अशिक्षित, एकल, विधवा, परितक्त्या महिला आहेत त्यांच्यासाठी एखादा लघुउद्योग, कुटीर उद्योग सुरू करता येईल का, त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी कोणते प्रयत्न करता यतील, पुढील शिक्षण देता यईल का? आरोग्य शिबीर भरवता येईल का? असे अनेक प्रकारचे कार्य या दिवशी आणि वर्षभर करता येऊ शकतात. त्यासाठी कुणाची मदत घ्यायची? काय करायचं हे आता ठरवण्याची वेळ आलेली आहे.
बाबासाहेबांना अपेक्षित असणारे कार्य उदा. सामुहिक आंतरजातीय विवाहाचे आयोजन करता येईल का? याविषयी सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये जनजागृती करता येईल का? आपल्या मुला-मुलींची, नातेवाईकांची अशी लग्न करता येतील का कारण जर समाज सुधारवायाचा असेल तर सुरुवात नेहमी स्वत: पासून करावी जेणे करून पुढे कुणाला बोलायला जागा राहत नाही. तसेच आपण जयंतीसाठी आपल्या किंवा बाबासाहेबांचे विचार मानणारे इतर समाजातील जिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा IAS/IPS दर्जाच्या, उच्च पदस्थ अधिकारी जे सरकारच्या निर्णय प्रक्रियेत समाविष्ट आहेत. त्या व्यक्तींना मार्गदर्शनासाठी बोलवले पाहिजे. जयंती ही विचारांची देवाणघेवाण करण्याचे एक महत्त्वाचं सशक्त माध्यम आहे हे विसरता कामा नये.
जयंती झाल्यावर पुढच्या वर्षीपर्यंत काहीच काम करायचं नाही आणि पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ असं करायचं हे नक्कीच बाबासाहेबांना अपेक्षित नसावं. अर्थात अनेक बांधवांचा हा आक्षेप असू शकतो की आम्ही आमच्या महामानवांच्या जयंतीला नाचायचे नाही का? तर अवश्य नाचा परंतु वेळ, काळ आणि मर्यादेचे भान ठेवा. आपले अनेक तरुण या दिवशी बंडा, मद्यपान किंवा तत्सम प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन करतात त्यांना आवर घाला. आपल्यामुळे इतर कोणाला, कसला ही त्रास होणार नाही याबाबत काळजी घ्या. अन्यथा एकाच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे सर्व समाज बदनाम होतो याचे अनेक उदाहरणे आहेत.
त्यामुळे प्रिय बंधू आणि भगिनींनो! छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही तर डोक्यात घेऊन वाचण्याचा, समजण्याचा आणि आपल्या बांधवांसह इतरांना समजावण्याचा आणि स्वत: कृतीशील जीवन जगण्याचा विषय आहे.
लेखक- डॉ. संदीप तपासे- ९८२२८८०२९८
टिप्पणी पोस्ट करा