Special :विविधतेत एकता



महेंद्र मिसाळ (श्रीगोंदा):भारत देशात विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे, भाषेचे लोक राहतात. विविधतेने नटलेली हि आमची मातृभुमी आहे. भारतात 'हम सब भारतीय एक है' अशीच भावना दिसून येते. अनेक धर्माचे लोक हे या मातृभुमीमधे प्रेमाने, बंधुभावाने, समतेने एकञ गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांच्या सण उत्सवात सर्व जातीधर्मांचे लोक आनंदाने सहभागी होतात. असेच दोन महत्त्वाचे सण आज आपण (22 एप्रिल) साजरे करतोय. आज हिंदुचा अक्षय तृतीया सण आहे तर मुस्लीम बांधवाचा पवित्र रमजान ईद आजच आहे. दोन्ही धर्माचे सण एकाच दिवशी येणे हे ही ऐक्याचेच प्रतिक आहे.

वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. अक्षय म्हणजे कधीच क्षय (नाश) न पावणारे. हा उत्सव साडेतीन मुहूर्तपैकी एक शुभ मुहुर्त आहे. या दिवशी वस्तुचे दान करतात. या दिवशी हिंदु धर्मात पितृ श्राध्द करून हिंदू-लोक जेवण घालतात. या तिथीस केलेले दान, हवन व पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजे अविनाशी आहे म्हणून या तिथीला अक्षय तृतीया हे नाव पडले आहे. हिंदू बांधव या दिवशी दान देतात ते फल देते असे म्हणतात. या दिवशी नवीन खरेदीस चांगला मुहुर्त असतो असे मानतात.

 दुसरीकडे याच दिवशी मुस्लीम बांधव रमजान ईद उत्साहात साजरी करतात. मुस्लीम धर्मात ईद हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान महिन्यात मुस्लीम बांधव, भगीनी उपवास (रोजा) करतात. लहान मुलांपासून मोठी माणसे रोजा करून अल्लाह प्रती भक्ती व्यक्त करतात. रमजान महिन्याला शेवटच्या दिवशी ईद-उल-फित्र साजरी केली जाते. ईद महिना संपल्यानंतर पहिल्यांदा चंद्र दिसतो त्यावेळी रमजान ईद साजरी केली जाते. ईद चा अर्थ आनंद व फितर म्हणजे दान करणे. या महिन्यात चंद्रदर्शन होईपर्यंत रोज उपवास केले जातात. सूर्य उगवण्यापूर्वी अन्न ग्रहण करायचे व पुर्ण दिवस सूर्यास्त होईपर्यंत उपवास करायचा असा दिनक्रम असतो. सूर्यास्त झाल्यानंतर नमाज करून प्राथना करून उपवास सोडायचा असा नियम मुस्लीम बांधव रोज पाळतात.या पवित्र दिवसात मुस्लीम बांधव कुराण शरीफ ग्रंथाचे वाचन करतात. रमजान ईद दिवशी मशिदीत एकत्र नमाज अदा करतात. नवे कपडे, नवे पदार्थ खरेदी केली जाते. लहान मुले मोठ्याकडे ईदी मागतात. रमजान महिन्यात तिसावा रोजा झाल्यानंतर चंद्र दिसतो त्याला ईद का चाँद मानले जाते. पूर्ण जगात एकाच वेळी ईद साजरी व्हावी म्हणून चंद्र दर्शनानंतर रमजान ईद साजरी केली जाते. मुस्लीम बांधव या दिवशी सर्व धर्मीय बांधवाना शिरखुमा खाण्या करिता आमंत्रण देतात. सर्व जाती धर्माचे लोकं एकमेकांच्या उत्सवात सहभागी होवुन एकमेकांना शुभेच्छा देतात. सर्व धर्मीय लोकं हे एकत्र येऊन विश्वबंधुतेचा संदेश देतात. एकूणच काय तर सर्व धर्मातील देवदेवतांनी, संतानी, प्रेषितांनी सर्वांना एकच समान संदेश दिला आहे तो म्हणजे मानवतेचा. सर्व मानव हि एकाच ईश्वराची लेकरे आहेत हाच संदेश आम्हाला सर्व धर्मीय ग्रंथामध्ये आढळतो. जसे देव, अल्लाह, प्रेषित हे मंदिर, मस्जिद, चर्च मधे आहेत तसेच ते माणसात आहेत असे समजून माणसाने माणसांशी सहकार्य करून माणुसकी जपली तर हिच खरी ईश्वराची भक्ती ठरेल.

लेखक - महेंद्र मिसाळ 9850392414. (लेखक हे वक्ते व अभ्यासक आहेत.)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने