ब्युरो टीम: कामगार संघटनांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार
करून कामगारांना न्याय देण्यासाठी नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय घेण्यात
येईल. असंघटीत कामगारांची नोंदणी आणि विभागातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी
तातडीने कार्यवाही करणार असल्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे
२५ कामगार संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि
प्रतिनिधींमार्फत कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले
होते. यावेळी विधानपरिषद सदस्य भाई जगताप, सचिन अहिर, प्रधान सचिव
विनिता वेद सिंगल, अपर कामगार आयुक्त
शिरीन लोखंडे, आयुक्त सतीश
देशमुख, कामगार नेते नरेंद्र
पाटील, राज्य अध्यक्ष
डॉ.डी.एल.कराड यांच्यासह अधिकारी आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सफाई कामगार, आरोग्य खात्याचे कामगार, माथाडी कामगार, घरकामगार, विडी कामगार,
विक्रेते, रिक्षाचालक, यंत्रकामगार,
ऊसतोड कामगार, स्थलांतरित कामगार, कंत्राटी कामगार यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी कामगारांच्या समस्या
मांडल्या.
मंत्री श्री. खाडे
म्हणाले, कामगार विभाग अधिक सक्षम
करण्याच्या दृष्टीने शासन कार्यरत आहे. उद्योग सुरू राहीले तर कामगार जगेल,
यासाठी कामगार केंद्रस्थानी ठेवून कामगारांच्या
कल्याणासाठी निर्णय घेण्यात आले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
कामगार विभागातील रिक्त
पदे भरण्याची कार्यवाही सुरू असून, पुढील कार्यवाहीस
गती देण्यात येत आहे. कामगारांसाठी क्षेत्रानुसार नवीन किमान वेतन तातडीने जाहीर
करण्यात येईल. कामगार कल्याण मंडळाच्या अर्धवेळ कामगारांना नियमानुसार पगारात वाढ
करण्यात येणार आहे. सुरक्षा मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना महानगरपालिका आणि शासनात
नियुक्त करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा करून निर्णय घेणार तसेच त्यांच्या
पगार वाढीसंदर्भात तातडीने निर्णय घेणार, असे मंत्री श्री. खाडे यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा