ahilyadevi holkar: पुण्यश्लोक - अहिल्याबाई होळकर



प्रा.महेंद्र मिसाळ: जगात अनेक व्यक्ती होऊन गेले ज्यांनी आपल्या कार्याने जनतेत ठसा उमटवला. जेव्हा-जेव्हा या मातृभुमीवर संकटे आली तेव्हा पुरुषाप्रमाणे अनेक स्त्रिया हि रणांगणावर तलवार हाती घेवुन मातृभूमीच्या रक्षणार्थ लढल्या. याच मातीमधे जिजाई , भिमाई, रमाई,अहिल्याई, सावित्री घडल्या ज्यांनी स्त्री हि काय करू शकते हे स्वकर्तृत्वाने दाखवुन दिले. अशीच एक स्री जिने उत्कृष्ट राज्यकारभार तर केलाच पण वेळप्रसंगी हातात तलवार घेवुन रणझूंजार मर्दानी प्रमाणे लढली व शत्रुला धुळ चारली. त्या पराक्रमी स्त्रिचे नाव होते - पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर.आज (३१मे) अहिल्याबाई होळकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा.

 चौंडी गावात शिंदे घराण्यात आहील्याचा जन्म झाला. बालपणापासूनच हुशार व चुणचुणीत असणारी आहिल्याई भविष्यात राज्यकारभार हाती घेवुन जगात कर्तृत्वाने नाव उमटवील अस कोणालाही वाटले नव्हते.इंदूरच्या होळकर घराण्यात अहिल्याचा प्रवेश झाला व या कर्तृत्वान स्त्रीने राज्यकारभार कसा करावा याचा आदर्शच समाजापुढे ठेवला. राज्यकारभार करताना त्यांनी कडक शिस्तीला प्राधान्य दिले.कर्तबगार लोकांचा सन्मान तर गैरव्यवहार करणाऱ्यास शिक्षा असे राज्यकारभाराचे सूत्र अहिल्याईने ठरवले. त्यांना जातीभेद मान्य नव्हता. विविध जाती-धर्माचे लोकांना त्यांनी विविध पदे दिली. स्वःताच्या मुलीचा मुक्ताबाईचा विवाह यशवंत फणसे नावाच्या तरूणाशी आंतरजातीय लावून दिला व स्वकृतीने जातीभेदाला मुठमाती दिली.त्यांच्या दरबारात सर्वांना समान न्याय   दिला जात असत. अन्याय करणाऱ्यांना कडक शिक्षा दिली जात असे.त्यांच्या राज्यात विविध कवी, साहित्यीक यांचा सन्मान होत असत. मोरोपंत, अनंत फंदी अशा कवींचा अहिल्यांनी नेहमी मान ठेवला. रणांगणावर हातात तलवार घेवुन जिजाऊचा वारसा जपत त्यांनी

शत्रुवर जरब बसवली. राघोबा दादा सारख्यांना धूळ चारून एक स्त्री काय करू शकते हे जगाला दाखवून दिले. जाट, रोहिले, रजपुत या सारखे मातबर शत्रूंना ही त्यांनी पाणी पाजले.

अहिल्यांनी पाच हजार लढाऊ स्रीयांची पलटण तयार केली होती यावरून अहिल्याईने दाखवुन दिले कि  स्री हि पुरुषाच्या बरोबरीने लढू शकते व उत्तम राज्य कारभारही करू शकते. स्वःताच्या आयुष्यात अनेक दुःखद घटना घडूनही हि पराक्रमी मर्दानी जनतेच्या कल्याणासाठी लढतच राहिली.राज्यात विविध मंदिराचा जीर्णोध्दार त्यांनी केला. त्यांनी भविकांसाठी काशी, महेश्वर येथे पाणपोई, अन्नछत्रे, धर्मशाळा उघडल्या. अनेक जुने रस्ते डागडुजी केले. पिण्याच्या पाण्यासाठी नविन तलाव खोदले. शेतकऱ्यांना कर्ज देऊन देशमुख, देशपांडे यांचा वतनाचा आधिकार काढून घेतला व शेतकऱ्यांची होणारी लुट थांबवली. भिल्ल, रामोशी, पारधी  जमातीतील काही गुन्हेगार तरुणांना मन परिवर्तन करत दरबारात अंगरक्षक, सैनिक म्हणून भरती करून घेतले. जे गुन्हेगार सुधारले नाही त्यांना कडक शिक्षा केल्या.

आदर्श राज्यकारभार कसा करावा याचे उत्तम उदारण म्हणजे अहिल्याई होळकर होय.स्वःताच्या जीवनात एकामागुन एक दुःखद घटना घडल्या. पती, सासरा, सासु मुलगा, नातू, भाऊ या सगळ्यांचा मृत्यु अहिल्याईच्या डोळ्या देखत झाला पण स्वतःचे दु:ख मनात ठेवुन ही राजमाता गोरगरिबांचे, पिडितांचे, शोषितांचे दुःख दूर करत कायम सत्यासाठी, न्यायासाठी संघर्ष करत राहिली. खरं तर आज समाजात छोटया दुःखाने तरुण, शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. राज्यात भष्ट्राचार, अत्याचार, अन्याय वाढत आहेत. खरंतर आज समाजाला गरज आहे ती आहिल्याईच्या विचारांची.जर अहिल्याचा विचार रोजच्या जीवनात जगताना आचरणात आणला तर नक्कीच सुराज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

- प्रा.महेंद्र मिसाळ

 ( सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक )

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने