Ahmednagar : सामाजिक सलोखा व धार्मिक ऐक्याचा संदेश देत अहमदनगर शहराचा स्थापना दिन साजरा



ब्युरो टीम : सामाजिक सलोखा व धार्मिक ऐक्याचा संदेश देत ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या 533 व्या स्थापना दिनानिमित्त रविवारी (28 मे) शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या बागरोजा येथील कबरीवर सर्व धर्मिय धर्मगुरुंच्या हस्ते चादर अर्पण करण्यात आली. हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात चादर अर्पणानंतर सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये एकात्मतेची मशाल प्रज्वलीत करण्यात आली. 

महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास उपस्थित असलेले धर्मगुरू गुरुभेजसिंह, मौलाना नदीम अख्तर, सोमनाथ जंगम देवा, श्रामनेर भन्ते नदीकश्यप यांनी शहराच्या एकात्मतेसाठी प्रार्थना केली. यावेळी हाजी मन्सूर शेख, उबेद शेख, हरजितसिंह वधवा, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक भूषण देशमुख, पत्रकार विजयसिंह होलम, अन्सार सय्यद, संध्या मेढे, युनूस तांबटकर, जैद शेख, विजयकुमार ठुबे, आर्किटेक फिरोज शेख, इकबाल शेख, रमीज शेख, नवीद शेख, जुनेद शेख, हामजा शेख, फैय्याज शेख, अब्दुल लतीफ, अशोक सब्बन, रवींद्र बोरा, पुरातत्त्व विभागाचे संदीप हापसे, सतीश भुसारी, जगदीश माळी, राजेश कुमार आदींसह इतिहास प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात उबेद शेख यांनी 18 मे 1490 साली अहमदनगर शहराची स्थापना अहमद निजामशहाने केल्याचे स्पष्ट करुन शहराच्या वैभवशाली व निजामशाहीच्या इतिहासावर उजाळा टाकला. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक भूषण देशमुख म्हणाले की, अहमद निजामशहा सत्ता बळकावण्याच्या दृष्टिकोनाने व आक्रमण करण्याच्या हेतूने आला नव्हता. त्याने स्वाभिमानी राज्य निर्माण करण्यासाठी बहुमनी राज्यातून बाहेर पडून अहमदनगर शहराची स्थापना केली. कर्तुत्ववान व्यक्तींना आपल्या राज्यात स्थान दिले व सर्व धर्म-पंथीयांनाबरोबर घेतले. शहराला सृजनशील, कर्तबगार राजा मिळाला. कैरो, बगदाद सारखा वैभव त्याने शहराला प्राप्त करून दिला. शहराचा हा पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी जाती-धर्माच्या कल्पना दूर ठेवून, पुन्हा सर्वांनी एकत्र येऊन वैभव प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले की, सर्व गुण्यागोविंदाने राहिल्यास शहराचा विकास साधला जातो. एकमेकांचा धर्मांचा, विचारांचा आदर केल्यास समाजात विकासाला चालना मिळत असते. विकासाचा मानबिंदू समोर ठेवून एकात्मतेसाठी घेतलेला कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. तर एकेकाळी इतिहासात शहराला सुवर्ण युगाचे वैभव प्राप्त होते. हा सुवर्णयुग पुन्हा निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन योगदान देण्याचे त्यांनी आवाहन करुन नगरकरांना शहराच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आभार आफताब शेख यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने