New Parliament Inauguration : भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब बनेल नवीन संसद भवन – पंतप्रधान नरेंद्र मोदी



ब्युरो टीम: पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. या भव्य सोहळ्यात हवन-पूजा करण्यात आली. तसेच सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्याहस्ते या नव्या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन संसदेत प्रवेश करण्यापूर्वी विधीवत पूजन-हवन केले. तामिळनाडूतील अध्यानम संतांनी वैदिक मंत्रोच्चार केला. लोकसभा सभागृहात बसवल्या जाणाऱ्या सेंगोलचे पूजन केले. यानंतर नवीन संसदेत पंतप्रधान मोदी यांनी संबोधन केले. यावेळी बोलताना, नवे संसद भवन १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

भारतीयांनी आपल्या लोकशाहीला संसदेची नवी इमारत भेट म्हणून दिली आहे. संसद भवन परिसरात सर्वधर्मीय प्रार्थना झाल्या. नव्या संसदेच्या लोकार्पणानंतर सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. नवी संसद हे १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. नवी संसद हे विश्वाला भारताच्या दृढसंकल्पाचा संदेश देणारे मंदिर आहे. नवीन संसद भवन आपल्या संकल्पांना सिद्धीशी जोडणारा दुवा सिद्ध होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

संसद भवनात कामकाज सुरु होईल, तेव्हा सेंगोल आपल्याला प्रेरणा देईल

हे फक्त संसद भवन नाही, हे १४० कोटी जनतेच्या आशा-आकांक्षाचे प्रतिक आहे. नव्या रस्त्याने मार्गक्रमण करूनच नवे मापदंड निर्माण करता येतात. संसद भवनात कामकाज सुरु होईल, तेव्हा सेंगोल आपल्याला प्रेरणा देईल. गुलामगिरी संपल्यानंतर भारताने आपला एक नवा प्रवास सुरु केला होता. हा प्रवास स्वातंत्र्याच्या अमृतकाळात येऊन पोहोचला आहे. हा अमृतकाळ देशाला नवी दिशा देण्याचा अमृतकाळ, आशा-आकांक्षांच्या पूर्ततेचा अमृतकाळ आहे. नव्या संसद भवनाला पाहून भारतीयांची ऊर अभिमानाने भरून येईल. या संसद भवनात वास्तू आणि वारशाचा संगम आहे. जुन्या संसद भवनात जागा नव्हती, तंत्रज्ञानाच्या समस्या होत्या. त्यामुळे देशाला नव्या संसद भवनाची आवश्यकता होती, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

देशाचा आणि जनतेचा विकास ही आपली प्रेरणा

 

पंचायत भवनापासून संसद भवनापर्यंत, आपल्या देशाचा आणि तेथील लोकांचा विकास ही आपली प्रेरणा आहे. नवीन संसदेच्या उभारणीचा आपल्याला जसा अभिमान वाटतो, तसेच गेल्या ९ वर्षांत देशात ४ कोटी गरीब लोकांसाठी घरे आणि ११ कोटी शौचालये बांधल्याचा विचार करताना मला खूप समाधान मिळते. भारत ही लोकशाहीची जननी आहे. जागतिक लोकशाहीचाही तो पाया आहे. लोकशाही हे आपले संस्कार, कल्पना आणि परंपरा आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

दरम्यान, नवीन संसद भवन भारतासोबतच जगाच्या प्रगतीलाही हातभार लावेल. ही इमारत आधुनिक सुविधांनी आणि अत्याधुनिक गॅजेट्सने सुसज्ज आहे. यामुळे ६० हजारांहून अधिक मजुरांना रोजगार मिळाला आहे. त्यांच्या मेहनतीचा गौरव करण्यासाठी आम्ही डिजिटल गॅलरी तयार केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने