गजानन कोंडीबा चौधरी : आजच्या प्रगत समजल्या जाणार्या जगात मानवाने भौतिक प्रगती मोठ्या प्रमाणात
साधण्यात यशस्वीता प्राप्त केली आहे. ही जरी बाब सत्य असली तरी आपल्या मुलांना
समजून घेताना पाहिजे तेवढे लक्ष देण्यात मनुष्य प्राणी पूर्णपणे यशस्वी झाला असे
दिसत नाही. कारण आज शालेय जीवनात विद्यार्थी गळती वाढताना व विद्यार्थी उपस्थिती
कमी होताना दिसते, यावर चिंतन होणे
ही काळाची गरज आहे.
मुले कुटुंब, शेजारी, परिसर इ. घटकांकडून अनुकरणीय वर्तन करतात. यासंदर्भात जॉन
लॉक नावाचे अनुभववादी तत्त्वचिंतक म्हणतात की 'ज्ञानाचे महावस्त्र अनुभवाच्या संवेदनाच्या धाग्याने
विणलेले असते' यावरून लक्षात
येते की, मूल समजून घेताना पालक,
शिक्षक, समाज यांनी आत्मपरीक्षणातून आत्मचिंतन करून मूलाच्या निकोप
वाढीसाठी संस्कारमय व आनंददायी वातावरण निर्माण करणे महत्वाचे आहे.
मूल समजून न घेतल्यामुळे येणार्या अडचणी :-
मूल हणजे मातीचा गोळा. या
गोळ्याला ज्याप्रमाणे अनुभवाचे थापे पडतात, त्याप्रमाणे आकार धारण होत असतो. पण या मूल असणार्या
गोळ्याला योग्य आकार नाही मिळाला तर अनेक अडचणी येतात.
त्या खालीलप्रमाणे आहेत.
1) शालेय उपस्थिती
:-
विद्यार्थी म्हणजेच मूल
होय. ही मुले त्यांच्या मनाला चार भिंतीच्या आतील बंधिस्त वातावरण आवडत नसेल तर
मूळ शाळेत येण्यास टाळाटाळ करतात, किंवा शाळाबाह्य
होतात यातूनच शाळेतील विद्यार्थी गळतीचे प्रमाण वाढते.
2) स्वभावात बदल :-
मुलांना त्यांच्या
आवडीनुसार पालकांनी वातावरण निर्माण नाही केले तर आपल्या
मनाविरुद्ध होत आहे,
म्हणून मूल रागीट स्वभावाचे बनतात. कारण
पालकांना व शिक्षकांना आपली मुले ही हुशार बनावीत असे मनोमन वाटते. परंतु आपली
विचारक्षमता आणि मूलांच्या विचारक्षमता यांच्यात खुपच तफावत असते. मुलांच्या
भावनांचाही विचार न केल्यामुळे ही मुले रागीट किंवा चिडचीड स्वभावाची बनतात.
3) संकुचित
प्रवृत्ती :-
लहान मुलांना त्यांच्या
मनानुसार इतर मुलांसोबत मुक्तपणे न खेळू देता, अभ्यासाचा सततच पुनरुच्चार होऊन घरीच राहावे लागत असेल तर
काही मुले संकुचित प्रवृत्तीची बनताना दिसतात. यामुळे अशा प्रवृत्तीची मुले
भविष्यात एखादे संकट समोर आल्यास समर्थपणे तोंड देण्यास अपयशी देखील ठरु शकतात.
4) सांघिक
भावना :-
मुलांना सांघिक
खेळापेक्षा फक्त फक्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याचे वारंवार सक्ती केल्यामुळे
मूलं एकलकोंडी बनण्याची शक्यता असते. यातून मूल नैराश्य, वैफल्यग्रस्त होऊन शालेय अभ्यासक्रमात अपयशी ठरण्याची
शक्यता असते. या सारख्या अडचणींपासून मुलांना मुक्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये
सांघिक खेळाची आवड निर्माण करणे काळाची गरज आहे.
मूल समजून घेण्यासाठीच्या उपाय योजना :-
मुले ही त्यांच्या
कलानुसार वर्तन करीत असतात. यामुळे पालक आणि शिक्षक या दोन घटकांनी मुलांच्या मनात
आनंद कशा पद्धतीने निर्माण करता येईल, या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. या आवश्यकता म्हणजेच मूल
समजून घेण्यासाठीच्या उपाय योजना खालील प्रमाणे आहेत.
1) शालेय
अभ्यासक्रमात बदल :-
लहान मुलांना शाळा ही बंदिखाना
न वाटता आपल्या मनाला आनंद देणारे ठिकाण आहे, असे जेंव्हा मुलांना वाटते, तेंव्ह् शाळेतील 100% उपस्थितीचे धोरण यशस्वी ठरते. यासाठी शालेय अभ्यासक्रम
बनवताना ग्रामीण, शहरी, आदिवासी अशा सर्वच गटातील विद्यार्थ्यांना आपण
शिकत असलेला अभ्यासक्रम बोजड न वाटता आनंददायी वाटला पाहिजे. असे जेव्हा
विद्यार्थ्यांना वाटते तेंव्हा आपण मुलांना समजून घेण्यात काही प्रमाणात यशस्वी
झालो असे म्हणता येईल.
2) कृतियुक्त
मनोरंजनात्मक शिक्षण:-
मूल समजून घेण्यासाठी
पालक व शिक्षकांनी मुले ही एकसारखी कधीच असू शकत नाहीत ही बाब सर्वप्रथम लक्षात
घेऊन मुलांच्या आवडी-निवडी, छंद, कला इत्यादींचे परीक्षण करून त्यांना कशात आनंद
वाटेल हे सर्वप्रथम शोधले पाहिजे आणि त्यानुसार आपल्या कल्पकतेप्रमाणे शैक्षणिक
साहित्य निर्माण करून आनंददायी शिक्षण बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे उदा. गणित
या विषयातला 'अंक स्थान' हा घटक जर आपण वेगवेगळ्या रंगांच्या दगडाचा
आधार घेऊन प्रत्येक रंगाला एकक, दशक, शतक इत्यादी स्थानदर्शक किंमती देऊन मुलांना
अध्यापन केल्यावर निश्चितच मुलांची उत्सुकता वाढेल असे मला वाटते.
3) बोलीभाषेतून
शिक्षण:-
लहान मुलांना कुटुंबात,
शेजारी, परिसरात बोलली जाणारी भाषा ही सर्वोत्तम भाषा वाटत असते,
या भाषेतूनच त्यांच्या संकल्पनाही स्पष्ट होत
असतात. त्यामुळे शिक्षकांनी बोली भाषाही आत्मसात करून अध्यापन केले पाहिजे. बोली
भाषा शिकण्यासाठी साधारणत: ८०० शब्दाचें अर्थ माहित करून घेणे आवश्यक आहे.
यापेक्षा जास्त शब्द आपण हिंदी, इंग्रजी भाषा
शिकण्यासाठी आत्मसात केले आहेत. म्हणून विद्यार्थ्याना बोली भाषेतून किंवा
बोलीभाषेच्या जवळपास जाऊन अध्यापन केले तर विद्यार्थ्याना शिक्षणाविषयी गोडी वाटू
लागून आनंददायी शिक्षण बनते.
4) निसर्गाच्या
सानिध्यातून अध्ययन:-
लहान मुलांच्या सुप्त
कलागुणांना वाव देण्यासाठी अभ्यासक्रमातील नैसर्गिक घटकांचे अध्ययन निसर्ग सहल,
वनभोजन, सागरी किनारे, किल्ले इत्यादी घटकांची प्रत्यक्ष भेट करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल
आणि त्यांना त्यांमधून आनंद मिळेल याकडे लक्ष द्यायला हवे. म्हणून शालेय
अभ्यासक्रम व शालेय तासिकांचे नियोजन करताना या घटकांचाही समावेश करणे आवश्यक आहे.
थोडक्यात, मूल समजून घेताना मुलांच्या भावनिक, मानसिक व बौद्धिक क्षमता विचारात घेऊनच
त्यांच्याशी आचरण करणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण मुलांना ज्या कृतीतून आनंद मिळतो ती कृती त्यांच्याकडून
पूर्ण समर्थन भावाने केली जाते. त्यातून मिळणारा आनंद त्यांच्या चेहर्याच्या व
कृतीच्या माध्यमातून ओसंडून वाहताना दिसतो, म्हणून पालक, शिक्षक आणि समाजातील इतर घटक यांनी सातत्याने लहान मुलांना समजून घेताना
आत्मपरीक्षण व आत्मचिंतन यातूनच कृती केली पाहिजे. जेणे करून लहान मुलांच्या
भावनांचा अनादर होणार नाही. आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा विकास होऊन ती
शारीरिक, मानसिक, बौद्धिक इत्यादी दृष्टीकोनातून सक्षम बनतील
पर्यायाने याच सक्षमीकरणातून त्यांच्यात सदाचार, सहानुभूती, नैतिकता इत्यादी
मानवतावादी मूल्यांची पायाभरणी होऊन एक सक्षम नागरीक म्हणून तयार होतील, अन यातूनच माणूस आणी माणूसकीची अतूट नाळ
वृद्धिंगत होईल, असे मला वाटते.
श्री.गजानन कोंडीबा चौधरी
सहशिक्षक
जि.प.प्रा.शा.पार्डी खुर्द
ता.वसमत जि.हिंगोली
टिप्पणी पोस्ट करा